भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे आमदार सुनील कांबळे पुन्हा वादात अडकलेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तेही राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्याला थेट कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांनी चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याच्याही थोबाडीत मारली. हा सर्व प्रकार ससून रुग्णालयात वॉर्डची पाहणी करताना घडला.
पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांकरीता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी कोनशिलेवर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. पाटीवर माझे नाव का नाही असे विचारत त्यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश सातव यांच्या कानशिलात लगावल्याचे समजते. त्यानंतर, मंचावरून खाली उतरताना त्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याच्याही कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
कांबळेंची सारवासारव -
मी पोलिसाच्या कानशिलात लगावली नाही. कानशिलात लगावणे हा वेगळा प्रकार असतो. मी फक्त त्याला धक्का दिला. त्याने माझे शर्ट खेचला होता. ती व्यक्ती कोण होती हेही मला माहित नव्हते, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न कांबळे यांनी केला आहे. तर, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यालाही मारहाण केली नाही असे सांगताना, 'मला त्याने तीनवेळा धक्का मारला म्हणून, हा कोण आहे? याकडे जरा बघा, असे मी पोलिसांना सांगितले. तेव्हा पोलिसांनी त्याला मारले, मी उलट त्याला सोडवायला गेलो होतो, असे स्पष्टीकरण कांबळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले आहे.
सुनील कांबळे अशाप्रकारे वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पुणे मनपातील महिला अधिकारी सुष्मिता शिर्के यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती.