सेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी? भाजप खासदाराची एकनाथ शिंदे यांच्यावर उघड टीका; "बेडूक कितीही फुगला तरी..."

बेडूक फुगला तरी हत्ती बनत नाही, असं बोंडे म्हणाले आहेत.
सेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी? भाजप खासदाराची एकनाथ शिंदे यांच्यावर उघड टीका; "बेडूक कितीही फुगला तरी..."

राज्याच्या प्रमुख वर्तमानपत्रात 'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात काल (13 जून) छापून आली. यानंतर काल दिवसभर सर्वत्र या जाहिरातीवरुन रणकंदन माजलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिवसेनेच्या मंत्र्यासोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरातीबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यांनी हात जोडले आणि ते निघून गेले. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट पंतप्रधान मोदींशी करण्यात आली होती. तसंच राज्यात त्यांच्या तोडीचा नेता नसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दैखील लोकप्रियता शिंदे यांच्यापेक्षा कमी असल्याचं या जाहिरातीत दाखवण्यात आलं होतं.

या घटनेवरुन भाजप आणि शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. विरोधी पक्षातील अनेकांनी या जाहिरातीवर भाष्य केलं. भाजपने मात्र उघडपणे यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट आणि उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावरुन भाजप- सेनेत वादाची ठिणगी पडली असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. अनिल बोंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना थेट एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. बेडूक फुगला तरी हत्ती बनत नाही, असं बोंडे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना थेट बेडकाशी केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावेळी त्यांनी वर्तमान पत्रात छापून आलेल्या सर्वेच्या जाहिरातीवर कडवट प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांच्या आजूबाजूचे त्यांना चुकीचे सल्ले देत असल्याचं ते म्हणाले आहेत. तसंच शिंदे यांना ठाणे म्हणजे पुर्ण महाराष्ट्र वाटायला लागला आहे, अशी बोचरी टिका देखील त्यांनी केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी देवेद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतूक केलं आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजासाठी काम करत असून त्यांच नाव खेड्यापाड्यांवर निघत असते. त्यामुळे हा सर्वे नेमका कोणी केला? तो ठाण्यापुरता मर्यादित होता का? की महाराष्ट्राचा होता? असा सवाल बोंडे यांनी उपस्थित केला आहे. तसंच त्यांनी शिवसेनेला पुढच्या काळात वाटचाल करायची असेल तर भाजप आणि जनतेची मने दुखवून स्वत:ला पुढे करुन चालणार नाही. टिमकी वाजवून सल्ले देणारे असतील तर त्यांचं कल्याण होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, शिंदे यांनी हिंदुत्वाच्या नावाने उठाव केला. बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यासाठी शिंदेनेंनी उठाव केला आहे. हा उठाव देशभक्ती, राष्ट्रभत्तीसाठी केल्याच सर्वजण मानतात. पण आता त्यांना (शिंदे यांना) लोकप्रियता वाढल्याचा समज झाला असेल तर त्यांचंच नुकसान होणार आहे. असं ते म्हणाले. तसंच ठाकरे सरकार पाच वर्ष राहिलं असतं तरी आमच्या २०० हून आधिक जागा निवडून आल्या असत्या. आता आमचं सरकार अडीच वर्ष राहणार असून अजूनही २००हून अधिक जागा निवडून येतील असं ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in