मुंबई : देवनार डंपिंगवरून आता राजकीय कलगीतुरा रंगत आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी आरोप केल्यानंतर आता भाजपचे मुंबई अध्यक्ष, मंत्री आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत टीकास्त्र सोडले आहे.
देवनार डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आता काढण्यात आलेली निविदेची किंमतही २,३६८ कोटी आहे. पूर्वी काढण्यात आलेली ४,५०० कोटींची निविदा मोठी आहे, असा थेट सवाल शेलार यांनी आदित्य ठाकरेंना विचारत धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.
देवनार डंपिंग ग्राऊंड साफ करण्यासाठी २,३६८ कोटींच्या खर्चाची निविदा पालिकेने काढली आहे. यावर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून टीका केली जाते आहे. या टीकेला शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एक्सवरील प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, निविदा निघताच कचऱ्यावर राजकारण करणारे आरोप करून देवनार क्षेपणभूमीबाबत रस दाखवू लागले आहे. याच कचऱ्यावरचे ‘कट-कमिशन’ खाऊन गेल्या २५ वर्षात गलेलठ्ठ झाले आहेत, अशी टीका शेलार यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेची (ठाकरे गट) सत्ता असताना २००८ मध्ये देवनार डंपिंग ग्राऊंड वरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याची किंमत ४,५०० कोटी होती. त्यावेळी आम्ही या कंत्राटाला विरोध केला होता. निधी वाया जाणार ही बाब आम्ही त्याचवेळी उघड केली होती. मात्र तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४,५०० कोटी रुपयांची देवनार डंपिंग ग्राऊंडची निविदा मंजूर केली. देवनारमध्ये आजही कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत. मुंबईकर गेली ४० वर्षे हैराण झाले आहेत, असेही शेलार यांनी म्हटले आहे.