भाजपचे मिशन मुंबई महापालिका, शिवसेनेची डोकेदुखी वाढणार ?

शिवसेनेला जागा दाखवण्यासाठी महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहावयास मिळते.
भाजपचे मिशन मुंबई महापालिका, शिवसेनेची डोकेदुखी वाढणार ?

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवले. या विजयानंतर आरोप-प्रत्यारोप झाले; परंतु राज्यसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपनेत्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी भाजप नेत्यांसह इच्छूक उमेदवारांचे मनोबल वाढले आहे. मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी ‘अर्थपूर्ण’ राजकारण होणार, यात दुमत नाही; मात्र भाजपबरोबर राजकीय मतभेद झाल्याने यंदाच्या निवडणुकीत सत्तेवर वर्चस्व कायम ठेवणे शिवसेनेसाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे मिशन मुंबई महापालिका असून, एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता शिवसेनेसाठी यंदाची निवडणूक टेन्शनची असणार, हेही तितकेच खरे.

भाजप सध्या केंद्रात सत्तेस्थानी आहे. शिवसेनेला जागा दाखवण्यासाठी महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहावयास मिळते. मुंबई महापालिका म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, मुंबई महापालिकेची सत्ता भाजपने काबीज केलीच, तर शिवसेनेला मोठा दणका बसेल. तसेच सेनेची पालिकेतील आर्थिक रसद तुटणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्तेवर वर्चस्व कायम ठेवणे शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार, यात शंका नाही.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असले, तरी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याचे वेळोवेळी जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाची मदार काँग्रेसच्या खांद्यावर आहे. त्यात शिवसेना विरुद्ध भाजप वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. राज्यात महाविकास आघाडी एकत्र संसार करत असले, तरी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी स्थापन होण्याची शक्यता कमीच आहे. त्यात महाविकास आघाडीतील मंत्री, आमदार ऐकमेकांविरोधात नाराजीचा सूर आळवत असल्याने भाजपसाठी सोन्याहून पिवळे झाले आहे. भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता कुठल्याही परिस्थितीत मिळवायची आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अर्थपूर्ण राजकारण होणार आहे. तसेच भाजपसोबतच मनसे, आम आदमी पार्टी, एमआयएम, या पक्षांचे तगडे आव्हान शिवसेनेसमोर आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असणार आहे.

प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. निवडणुका कधी होतील, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईलच. प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना फटका बसला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी असून, उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी स्थापन झाली, तर मात्र याचा फटका तिन्ही पक्षांना बसणार आहे. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे उमेदवार ज्यांना आघाडी झाल्यास उमेदवारी, तिकीट मिळणार नाही ते बंडखोरीचा मार्ग अवलंबणार आणि अपक्ष किंवा अन्य पक्षाचा मार्ग स्वीकारणार. त्यामुळे यंदाची निवडणूक ही भाजपसाठी मिशन असली तरी ती शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते.

logo
marathi.freepressjournal.in