ठाकरेंना चुचकारण्याचे भाजपचे प्रयत्न, चंद्रकांत पाटील यांनी केले उद्धव यांचे कौतुक

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले. भाजपची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे. त्यानंतर आता भाजप नेते जमिनीवर आले असून त्यांचा सूरही काही प्रमाणात बदलला आहे.
ठाकरेंना चुचकारण्याचे भाजपचे प्रयत्न, चंद्रकांत पाटील यांनी केले उद्धव यांचे कौतुक
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले. भाजपची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे. त्यानंतर आता भाजप नेते जमिनीवर आले असून त्यांचा सूरही काही प्रमाणात बदलला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे चक्क कौतुक केले आहे. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निवडणूक प्रचारादरम्यान एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंशी असलेल्या मैत्रीला उजाळा दिला होता. आता चंद्रकांत पाटील यांच्या ताज्या वक्तव्यामुळे भाजपकडून उद्धव ठाकरेंना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे.

चंद्रकांत पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, शिवसेना भाजपसोबत असताना २३ जागा लढली होती. त्यातील १८ जागा त्यांनी जिंकल्या होत्या. लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी खूप मेहनत घेतली. एक मित्र म्हणून त्यांची मला काळजी वाटत होती. आजारपणाच्या काळातही ते खूप फिरले, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. इतके सगळे करून त्यांनी काय मिळविले. १८ वरून ९ जागा झाल्या. दुसऱ्या बाजूला अल्पसंख्यांकांच्या मतावर ते विजयी झाले, असा ठपका पडला. २०१९ ला जर आमच्यासोबत राहिले असते तर ही वाताहत झाली नसती. उलट याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला आहे. २०१९ ला जर युती झाली असती तर ज्यांनी घरी जायचे त्यांना आता १३ आणि ८ जागा मिळाल्या नसत्या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती दर्शविणारे वक्तव्य केले होते. ‘उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळात मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होतो’, असे मोदी म्हणाले होते. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील हे उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत आहेत. केंद्रात भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळालेले नाही. तसेच आगामी विधानसभा निवडणुकांतदेखील चांगली कामगिरी करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारा सूर बदलत चालला आहे का, असा प्रश्न चर्चिला जात आहे.

ठाकरे हे व्यक्तिगत शत्रू नाहीत असे मोदी यांनीच म्हटलेय - फडणवीस

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपले व्यक्तिगत शत्रू नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते. जेव्हा ठाकरे आजारी होते, त्याही वेळी त्यांची ते विचारपूस करीत होते. फोन करून मदत करण्याची तयारीसुद्धा दर्शवित होते, याची आठवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बातचीत करताना जागवली आहे. तसेच, राजकारणात कुणीही आपला वैयक्तिक शत्रू नाही. आहेत ते केवळ राजकीय विरोधक, असे मोदी यांनी म्हटल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे.

उद्धव ठाकरे भाजपबरोबर जाण्यास अनुत्सुक

बदललेल्या राजकीय परिस्थितीत विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना चुचकारण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असला तरी उद्धव ठाकरे यांनी, मात्र पक्षाच्या कार्यकर्ता व जिल्हाप्रमुखांच्या मेळाव्यात ‘नकली पक्ष’ आणि ‘नकली संतान’ म्हणून आपल्याला हिणवणाऱ्या भाजपसोबत यापुढे कदापि हातमिळवणी करणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in