व्हायरल ऑडिओ क्लिपवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण ; म्हणाले...

चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांना चहा प्यायला नेण्याचा तसंच ढाब्यावर जेवायला घेऊन जाण्याचा सल्ला देत असतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसत आहे
व्हायरल ऑडिओ क्लिपवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण ; म्हणाले...

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसत आहे. यात ते भाजपच्या कार्यकर्त्यांना पत्रकारांना चहा प्यायला नेण्याचा तसंच ढाब्यावर जेवायला घेऊन जाण्याचा सल्ला देत आहेत. जेणेकरुन पत्रकारांनी २०२४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपविरोधात बातम्या छापू नये, असं सांगताना दिसत आहेत. रविवार (२४ सप्टेंबर) रोजी अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मोर्चेबांधणीविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी केलेल्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही काम करत असलेल्या बुथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? त्याची माहिती घ्या. आपण इतकं चांगलं काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत. त्याची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यालया बोलवा. त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये. यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलवा म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना ढाब्यावर वगैरे घेऊन जायचं. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. आपल्या विरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे.

आता बावनकुळे यांनी त्यांच्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, मी ते असंच बोललो. की बाबा रे आपण एवढं चांगलं काम करतो. पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षात एवढं चांगलं काम केलं आहे. तरी आपल्याबद्दल नकारात्मक बातम्या येतात. त्यामुळे पत्रकारांसोबत बसा त्यांचा सन्मान करा. त्यांना चहा प्यायला घेऊन जा, तुम्ही त्यांना चहासाठी बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यांना वस्तूस्थिती सांगा. शेवटी पत्रकार हे आपल्या व्यवस्थेचा चौथा स्तंभ आहेत. त्यांना सन्मान देऊन त्यांच्याबरोबर चांगलं वागा. असा सल्ला मी पदाधिकाऱ्यांना दिला, त्यात काही वाईट नव्हतं. असं बावनकुळे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in