चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. एकीकडे अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला.
चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला
Published on

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर प्रदेश काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासह नाना पटोले, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात आणि इतर वरिष्ठ नेते होते. शरद पवार यांच्याशी त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली. महाविकास आघाडीबाबत चर्चा झाल्याचे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

“ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील आम्ही चर्चा केली. आम्ही लवकरात जागावाटप निश्चित करु. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाबाबतही चर्चा झाली. शरद पवार यांच्यासोबत चांगली चर्चा घडली. जवळपास दोन तास चर्चा झाली. आम्ही विस्ताराने चर्चा केली आहे. येत्या काळात महाविकास आघाडीचा कार्यक्रम सुरु होईल. आम्ही सर्व एकत्रितपणे काम करु”, असे चेन्नीथला म्हणाले.

रमेश चेन्नीथला यांना राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी देणार? असा प्रश्न उपस्थित केला. पण त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर टाळले. यासाठी आमची बैठक आयोजित करण्यात आल्याचं ते म्हणाले. तसेच “राज्यसभेसाठी काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार. त्यामुळे आम्ही वाट पाहत आहोत. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहेत”, असंही रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं.

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. एकीकडे अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. तर नाना पटोलेंसह महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी शरद पवारांची भेट घेतली.

logo
marathi.freepressjournal.in