
आज (१९ जून) शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन आहे. सध्या शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडल्याने शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापनदिन साजरा होत आहे. या निमित्ताने दोन्ही गटाकडून वर्धापनदिनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि पुर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक छगन भुजबळ यांनी आपल्या भावाना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत शिवसेना अभेद्द रहावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ते नाशिक येथे माध्यमांशी संपर्क साधत होते.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, "मी १९७३ साली नगरसेवक, तर १९७८ ला शिवसेनेचा गटनेता झालो. तेव्हापासून शिवाजीपार्क येथे होणाऱ्या सभेत बोलण्याची बाळासाहेबांनी संधी दिली. त्यानंतर मी महाराष्ट्रात शिवसेनेचं काम केलं. पण, शिवसेना फुटली हे मनाला पटत नाही ", अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, अचानक विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे हे शिंदे गटात कशा गेल्या कळलं नाही, कारण १० महिन्यापासून ते शिंदे यांच्याविरोधात बोलत होत्या. त्या उद्धर ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिक असल्याचं मला वाटलं. हा प्रवाह अजूनही चालू आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमच्या मनात कायम असल्याचही भुजबळ यावेळी म्हणाले. तसंच दोन्ही शिवसेनेत खरी कोणती हे लोक सांगतील, असं देखील भुजबळ म्हणाले आहे.
तसंच शिवसेना फुटल्याचं वाईट वाटत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. कठीण प्रसंगात बाळासाहेब ठाकरेंबरोबर शिवसैनिक उभे राहायचे. बाळासाहेबांनी एक शब्द दिल्यावर पोलीस अटक करतील याची भीती नसायची. ती शिवसेना विस्कळीत झाली. मी , नारायण राणे, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडलो. असं भूजबळ यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी शिवसेना अभेद्य रहावी अशी मनापासून इच्छा असल्याचंही ते म्हणाले.