
शिवसेनेनं १३ जून रोजी राज्यातल्या प्रमुख वर्तमान पत्रांना दिलेल्या जाहिरातीवरुन राजकीय वर्तूळात चांगल्याचं चर्चा रंगल्या होत्या. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचं एका सर्वेच्या हवाल्यानं दाखवण्यात आलं होतं. यावरुन राज्यातील सेना-भाजप सरकारीमध्ये अंतर्गत कुरबुरी असल्याची चर्चा जनमानसात रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांनी देखील या जाहिरातीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. ते माध्यमांना हात जोडून निघून गेल्याचं यावेळी पहायला मिळालं. या जाहिरातीवरुन गढूळ झालेलं वातावरण निवळण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ जून रोजी शिवसेनेकडून दुसरी जाहिरात देऊन त्यात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र, १३ जून रोजीच्या जाहिरातीवरुन शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये टीका-टीपण्णी सुरु होती.
आता मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जाहिरातीवरुन मौन सोडलं असून त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या जाहिरातीमुळे काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, आम्ही २५ वर्ष एकत्र होतो, मात्र या वर्षभरातला प्रवास अधिक घट्ट असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख लोकप्रिय उपमुख्यमंत्री असा करत फडणवीस आणि माझी मैत्री जूनी असल्याचं म्हटलं आहे. तसंच ये फेविकॉल का जोड है, असं म्हणत युतीत सर्वकाही सुरळीत सुरु आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच हेलिकॉप्टरमधून पालघरमध्ये दाखल झाले. त्यांनी शासन माझ्या दारी या योजनेबाबत पालघर येथे आयोजित कार्यक्रमात याबाबत वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासूनचा आमचा प्रवास असून गेल्या वर्षभरात आमचं नात घट्ट झालं आहे. कुठल्या जाहिरातीमुळे किंवा कोणी काही बोलेलं म्हणून काहीतरी होईल एवढं तकलादू आपलं सरकार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, आमच्या युतीत मिठाचा खडा गेल्या वर्षभरापूर्वी टाकला होता, आम्ही तो फेकून दिला आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझी दोस्ती आताची नाही. आम्ही आमदार होतो तेव्हापासून आमची मैत्री होती. हा फेविकॉलचा जोड असून कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही. काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते जनतेने त्यांना दूर केलं आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.