भिवंडी मतदारसंघात अटीतटीची लढत; कपिल पाटील, सुरेश म्हात्रे, निलेश सांबरे यांच्यात चुरस

भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी ४८ अर्ज दाखल केले होते.
भिवंडी मतदारसंघात अटीतटीची लढत; कपिल पाटील, सुरेश म्हात्रे, निलेश सांबरे यांच्यात चुरस

शहापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी ४८ अर्ज दाखल केले होते. ४ मे २०२४ रोजी अर्ज छाननीच्या दिवशी ५ जणांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या तारखेला, म्हणजे ६ मे रोजी, ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता या मतदारसंघात एकूण २७ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. त्यामधे भाजपचे कपिल मोरेश्वर पाटील, महाविकास आघाडीचे सुरेश गोपीनाथ म्हात्रे, बहुजन समाज पक्षाच्या मुमताज अन्सारी याचा समावेश आहे.

राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्षांचे एकूण ७ उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत. त्यामधे संयुक्त भारत पक्षाचे अशोक बहादरे, बहुजन महा पार्टीचे दानिश शेख आदींचा समावेश आहे. तर अपक्ष म्हणून या  वेळी भिवंडी लोकसभा मतदार संघात एकूण १७ जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यामध्ये कपिल जयहिंद पाटील, चंद्रकांत मोटे, सुरेश सीताराम म्हात्रे, नीलेश भगवान सांबरे, सोनाली गंगावणे, विशाल मोरे, मिलिंद कांबळे, रंजना त्रिभुवन आदींचा समावेश आहे.

मात्र या लोकसभा मतदारसंघात खरी आणि अटीतटीची लढत भाजपचे उमेदवार कपिल पाटील,  महाविकास  आघाडीचे  सुरेश म्हात्रे  आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे या तिघांमध्ये सामना रंगणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत आगरी समाजाच्या खासदारांनीच बाजी मारली आहे.

भिवंडी हा लोकसभेचा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा. या काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात भाजपचे खासदार कपिल पाटील हे सलग दोनदा संसदेत पोहचले आणि ठाणे जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाले. पुन्हा मतांची विभागणी टाळण्यास विरोधी पक्ष अपयशी ठरल्याने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे या तिघांमध्ये या वेळेस  या मतदारसंघात खरी लढत पहावयास मिळणार आहे. या मतदार संघात या वेळी सहा महिला खासदारकीच्या साठी उभ्या आहेत. भिवंडी लोकसभा मतदार संघात मुस्लीम मते, दलित -  आदिवासी मते विजयी उमेदवाराबाबत निर्णायक ठरणार आहेत.

या लोकसभा मतदार संघात जनतेच्या अनेक समस्या आहेत. त्यामध्ये पाणी, रस्ते, रोजगार, आरोग्य यांसह कल्याण आसनगाव, कसारा या मध्य रेल्वेच्या मार्गांवरील रेल्वस्थानकावरील सुविधा, रेल्वे गाड्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत वाढलेली नाही. याकडे लोकप्रतिनिधी म्हणून कपिल पाटील यांनी फारसे  लक्ष दिले नाही. लोकसंख्या वाढत असल्याने या रेल्वे मार्गावर रेल्वे गाड्या वाढविण्याची आवश्यकता आहे. शहापूर तालुक्यात तीन प्रचंड धरणे असून सुद्धा दरवर्षी  या तालुक्यात प्रचंड पाणी टंचाई असते. याकडे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार यांचे लक्ष नसते. पाणी टंचाईवर उतारा म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. रोजगाराची समस्या या तालुक्यात प्रचंड मोठी अशी आहे. रोजगार उपलब्ध होण्यासाठी काम करण्याची गरज आहे.

आसनगाव या ठिकाणी बस स्थानक नसल्याने अनेक बसेस आसनगाव या ठिकाणी येतात. शहापूर येथून  ग्रामीण भागात जातात.  आसनगाव येथून रिक्षा करून प्रवाशांना शहापूर येथे येऊन  बसने  आपल्या गावापर्यंत प्रवास करावा लागतो. शहापूर शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांचे रुंदीकरण, शहरात करमणुकीची साधने, मैदाने, बगीचे, पार्किंग व्यवस्था आदी बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

भिवंडी लोकसभा मतदारसंघात जनतेच्या अनेक समस्या आहेत. पाणी, रस्ते, रोजगार, आरोग्य अशा सुविधांची कमतरता आहे. बस आणि रेल्वेच्या पुरेशा फेऱ्या नाहीत. याकडे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार यांचे लक्ष नसते.

logo
marathi.freepressjournal.in