राष्ट्रवादीची कमान अजित पवारांकडे! शरद पवार यांनी पक्ष गमावला

राष्ट्रवादी काँग्रेसच्याही आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू असून निकाल लवकरच अपेक्षित आहे.
राष्ट्रवादीची कमान अजित पवारांकडे! शरद पवार यांनी पक्ष गमावला

प्रतिनिधी/मुंबई

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केले आहे. शरद पवार यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही निकाल आयोगाने दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल आल्याने अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निवडणूक आयोगाच्या निकालाचा दाखला देण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्याही आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू असून निकाल लवकरच अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाचा निकाल बाजूने लागल्याने अजित पवार गटाला अपात्रता प्रकरणात देखील त्याचा आपसुक फायदा होणार आहे. निवडणूक आयोगाचा निकाल आपण विनम्रपणे स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी एक्स या माध्यमातून दिली आहे. आपल्या नावासमोर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस असे लिहिले आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निकालानंतर अजित पवार यांच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचाही खटला निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता. निवडणूक आयोगाने याचा निकाल दिला असून अजित पवार यांच्याकडीलच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार वापरू शकतील. शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवायला सांगण्यात आले आहे. दोन खासदार अजित पवार यांच्या बाजूने आहेत. पाच आमदारांनी दोन्ही बाजूने पत्र दिले आहे. पक्षांतर्गत निवडणुका न झाल्याकडे निवडणूक आयोगाने बोट ठेवले आहे. महाराष्ट्रातील ४१, तर नागालँडमधील ७, झारखंडमधील १, विधान परिषदेतील ५ आमदार अजित पवारांच्या बाजूने आहेत, तर शरद पवार यांच्यासोबत महाराष्ट्रातील १५ आमदार आहेत. पाच आमदार व एका खासदाराने दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

शिवसेनेच्या प्रकरणात ज्या पद्धतीने निकाल झाला त्याच पद्धतीने या प्रकरणातही निकाल झाला आहे. अजित पवार गटाला हा मोठा दिलासा मानला जात आहे, तर शरद पवार गटाच्या अडचणी यामुळे वाढणार आहेत. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे शरद पवार गटाने स्पष्ट केले आहे. पण आता राज्यसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. जर राज्यसभेची निवडणूक झाली तर शरद पवार गटाच्या आमदारांना अनिल पाटील यांचा म्हणजेच अजित पवार यांचा व्हीप मानावा लागणार आहे. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे. शरद पवार गटाला आता नवीन चिन्ह शोधावे लागणार आहे.

कार्यकर्त्यांचा जल्लोष

निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्याचे फटाके फोडून स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात एकच जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून अभिनंदन केले.

आमचा चेहरा, पक्ष, चिन्ह शरद पवार -जितेंद्र आव्हाड

आमचा चेहरा, पक्ष, चिन्ह हे शरद पवारच आहेत. हे ज्यांच्यामुळे मोठे झाले तो सगळ्यांचा बाप शरद पवार आमच्यासोबत आहे. ही सगळी नुराकुस्ती आहे. सगळे ठरवून केले जात आहे. हा निर्णय अपेक्षितच होता. महाराष्ट्रातील जनता सर्व जाणते, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयात जाणार- जयंत पाटील

शरद पवारांनी शून्यातून पक्ष उभा केला. त्याची फळे चाखणारे अनेक जण आहेत. शरद पवारांमुळे आमच्यासारख्या अनेकांना मंत्रीपदे मिळाली आज तोच पक्ष पवारसाहेबांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतोय. या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, तीच आमची शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालय याला लवकरच स्थगिती देईल, ही आम्हाला अपेक्षा आहे. परिस्थिती कशीही असली तरी आम्ही डगमगणारे नाही. पवारसाहेबांच्या साथीने याला तोंड देऊ. पवारसाहेब जिथे उभे राहतात तिथे महाराष्ट्रात पक्ष उभा राहतो, हा आमचा विश्वास आहे. शरद पवार हाच पक्ष असा समजणारे अनेक मतदार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

आमदार अपात्रता निकाल पुढील आठवड्यात?

केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निकाल दिल्यानंतर आता आमदार अपात्रतेचा निकालदेखील लगेच लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर १४ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निकाल देण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर नार्वेकर यांचादेखील निर्णय तोच असणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.

अदृश्य शक्तीने पक्ष ओरबाडून घेतला -सुप्रिया सुळे

“अदृश्य शक्तीचे हे यश आहे. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले असेल. राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठी माणसाचा पक्ष आहे. शरद पवारांनी पक्ष शून्यातून उभा केला आहे. त्यांनी स्वत: पक्ष उभा केला आहे. त्यांच्याकडून हा पक्ष काढून घेण्यात आला आहे. त्याचे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. पक्षाची संघटना शरद पवारांच्या बाजूने आहे, त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेबरोबर केले, तेच आमच्याबरोबर केले आहे. आम्ही आता उमेदीने पुन्हा काम करू. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तीन नावे आणि तीन चिन्हे द्या, असे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितले आहे. आम्ही ते देऊ. आम्ही पुरावे दिले, युक्तिवाद केला. आमच्याकडे फक्त एक गोष्ट नाही, ती म्हणजे आमच्याकडे अदृश्य शक्ती नाही,” असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी हाणला आहे.

आयोगाचा निकाल मी विनम्रपणे स्वीकारतो

गेल्या वर्षी राज्यात राजकीय घडामोडी राज्यात घडल्या. कोणत्याही पक्षासंदर्भात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याची परंपरा आहे. त्याप्रकारे आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. त्यामध्ये आम्हीही आमचं म्हणणं मांडलं, इतरांनीही त्यांचं म्हणणं मांडलं. त्यावर अनेक तारखा पडल्या. सगळ्या वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर लोकशाहीत बहुमताला प्राधान्य दिलं जातं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ, झेंडा सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, बाबा अत्राम, आदिती तटकरे यांच्याह ५० आमदारांनी घेतलेल्या निर्णयावर आज निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. हा निकाल मी विनम्रपणे स्वीकारतो. आम्ही निवडणूक आयोगाचेही आभार मानतो.

- अजित पवार

अजितदादांसोबत कोण?

महाराष्ट्रातील ४१ आमदार

नागालँडमधील ७ आमदार

झारखंड १ आमदार

लोकसभा खासदार २

महाराष्ट्र विधानपरिषद ५

राज्यसभा १

शरद पवारांसोबत कोण?

महाराष्ट्रातील आमदार १५

केरळमधील आमदार १

लोकसभा खासदार ४

महाराष्ट्र विधानपरिषद ४

राज्यसभा - ३

logo
marathi.freepressjournal.in