"गुणरत्न सदावर्तेंनी वकिलाचा काळा कोट काढून...", राष्ट्रवादी काँग्रेसकडून सदावर्तेंचा समाचार

राज्यात अशांती पसरण्याचा कॉन्ट्रॅक्ट सदावर्तेंनी घेतला असल्याची जहरी टीकाही महेश तपासे यांनी केली.
"गुणरत्न सदावर्तेंनी वकिलाचा काळा कोट काढून...", राष्ट्रवादी काँग्रेसकडून सदावर्तेंचा समाचार

वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता त्यांनी राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथ्थूराम गोडसे विषयी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सदावर्ते यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

संपूर्ण जगाने राष्ट्रपीता महात्मा गांधींचा सत्य व अहिंसा, शांती व सद्भावना हा सुविचार स्वीकारला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शासकीय कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर पंतप्रधानांनाही नतमस्तक व्हावं लागतं. तसंच आरएसएसला खुलेआम गांधी विचारांचा विरोध करता येत नाही. यासाठी गुणरत्न सदावर्ते सारखे काही एजंट आरएसएसने नेमले आहेत. अशी घनघाती टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नथुराम गोडसेचे अखंड हिंदू राष्ट्राची संकल्पना मान्य नव्हती. हे सदावर्ते आरएसएस प्रेमी झाल्यामुळे विसरले आहेत. आता त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही. असं देखील तपासे पुढे म्हणाले.

भारतात दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्यांक सवर्ण हे सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत असताना राज्यात अशांती पसरण्याचा कॉन्ट्रॅक्ट सदावर्तेंनी घेतला असल्याची जहरी टीकाही महेश तपासे यांनी केली.

सदावर्ते वकील असून त्यांना भारतीय राज्यघटना कळत नाही, सदावर्तेंनी वकिलाचा कोट काढून आरएसएसचा खाकी गणवेश परिधान करावा, असा टोलाही महेश तपासे यांनी यावेळी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in