"...तर दोघांनाही लोळवलं असतं", तुरुंगातून सुटल्यावर दत्ता दळवी यांची पहिली प्रतिक्रिया

मला जाणूनबुजून अटक केली. हा सत्तेचा माज आहे, असंही ते म्हणाले.
"...तर दोघांनाही लोळवलं असतं", तुरुंगातून सुटल्यावर दत्ता दळवी यांची पहिली प्रतिक्रिया
Published on

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी तीन दिवसापासून अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अखेर जामीन मंजूर झाला. दळवी हे घरी परतल्यावर त्यांच्या कुटुंबाने त्यांची आरती ओवाळून स्वागत केलं. आम्ही गद्दारांची औलाद नाहीस, शिवसेनेचं रक्त आहे आमच्यात, गाडी फोडतानांना तिथे असतो तर दोघांना लोळवलं असतं, अशी प्रतिक्रिया दत्ता दळवी यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले की, यावेळी शिवसैनिक माझ्याबरोबर नाही तर शिवसेनेबरोबर उभे राहिले. ही बाळासाहेबांची किमया आहे. आम्ही गद्दारांची औलाद नाही. धर्मवीर आनंद दिघे यांच्या चित्रपटात ही शिवी दिली गेली आहे. तरीही मला जाणूनबुजून अटक केली. हा सत्तेचा माज आहे, असंही ते म्हणाले.

यावेळी गाडी फोडण्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझं वय ७१ असलं तरी माझ्यात शिवसेनेचं रक्त आहे. माझी गाडी फोडली तेव्हा मी असतो तर दोघांना लोळवलं असतं. मी जेलमध्ये असताना ते कुणाला भेटले, कुठे बसले होते मला माहिती आहे. गांडूगिरी करुन काय होणार? समोरच्यांची ही भ्याड वृत्ती आहे. आमच्या कुटुंबाला ही वेळ नवी नाही. शिवसेनाप्रमुखांनी घडवलं, शिवसैनिक सदैव सोबत असतात. जेलमध्येही व्यवस्था केली, असं दत्ता दळवी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अटक केल्यानंतर पक्षप्रमुखांनी दोनदा फोन केला होता. त्यावेळी आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत असं त्यांनी आश्वासन दिलं. आता तुरुंगातून सुटल्यावर मातोश्रीवर जाणार, असं देखील त्यांनी सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in