भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वात लोकप्रिय मंत्री आहेत. गडकरी यांच्या कामाच्या धडाक्याने तसेच स्पष्टवक्तेपणामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते हे गडकरींच्या कामाचे कौतूक करताना दिसतात. पण मागील काही दिवसांपासून गडकरी हे नाव वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. नितीन गडकरी यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्यांना जीवे मारल्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली असून या प्रकरणी तपास केला जात आहे.
गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोननंतर नागपूर पोलीस देखील अलर्ट झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नागपूर येथील निवस्थानी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच निवास्थानी आणि कार्यलयात बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांकडून सुरक्षेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापुर्वी देखील त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला आहे. कर्नाटकातील बेळगाव येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गुन्हेगार जयेश पुजारी याने गडकरींकडे 100 कोटी रुपयांनी खंडणी मागून बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. नागपूर पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत जयेश पुजारीला अटक होती. तसेच त्याच्यावर एपीए कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. सध्या जयेश पुजारी एनआयए पथकाच्या ताब्यात आहे.