"युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा", मनसेच्या आंदोलनावर दीपाली सय्यद यांचा खोचक टोला

दीपाली सय्यद यांनी केलेल्या वक्तव्यावर आता मनसेकडून काय प्रत्युत्तर येते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
"युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा", मनसेच्या आंदोलनावर दीपाली सय्यद यांचा खोचक टोला

राज्यातील रस्त्यांची अवस्था काही आपल्यापासून लपलेली नाही. रस्त्यांच्या दुरावस्थेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्रमक अशी भूमिका घेतली जात आहे. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे देखील या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. या वादात आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी उडी घेतली आहे. त्यांनी रस्त्यांच्या मुद्यावरुन आक्रमक होणाऱ्या मनसेवर कठोर शब्दात टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकच्या सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर असलेल्या टोलनाक्याची तोडफोड केली होती. ही घटना बरेच दिवस चर्चेत राहीली. या तोडफोडीवरून सत्ताधारी पक्षांकडून मनसेवर टीका देखील करण्यात आली होती. अमित ठाकरे त्यांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरून मुंबईला जात असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. यानंतर मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. या तोडफोडीवरून खूप लोकांनी अमित ठाकरे यांना प्रश्न देखील विचारले होते. आता मनसेने रस्त्यांवर असलेल्या खड्यांवरुन आक्रमक भूमिका घेतल्याने शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत मनसेला चांगलंच सुनावलं आहे.

दीपाली सय्यद यांनी ट्विट केले की, "मनचेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी, राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! दोन दिवसाचे काम, उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान आणि बाहेर स्टंटबाजी करून पण! युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा!" आता दिपाली सय्यद यांच्या या ट्वीटनंतर मनसेकडून काय आणि कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in