दिल्ली पोलिसांचा मनीष सिसोदियांसोबत गैरव्यवहार; अरविंद केजरीवाल यांना संताप अनावर

पोलिसांनी मनीष सिसोदिया यांना मानेला धरुन नेल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
दिल्ली पोलिसांचा मनीष सिसोदियांसोबत गैरव्यवहार; अरविंद केजरीवाल यांना संताप अनावर
Published on

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सोबत गैरव्यवहार केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्डिडिओनंतर आपच्या समर्थकांनी तसेच कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या व्हिडिओला रिट्विट करत संताप व्यक्त केला आहे. मनीष सिसोदिया यांना आज दिल्लीतील राऊस एवेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मनीष सिसोदिया यांना मानेला धरुन नेल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यांनतर अनेकांनी दिल्ली पोलिसांच्या या वर्तवणुकीवर टीका केली आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या आपच्या नेत्या आतिशी यांनी या प्रकारावर संताप व्यक केला आहे. आतिशी यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हणल्या की, "राऊस एवेन्यू कोर्टात हा पोलिस कर्मचारी मनीष सिसोदिया यांच्यासोबत गैरव्यवहार करत आहे. दिल्ली पोलिसांनी त्याचे तात्काळ निलंबन करावे" असे ट्विट त्यांनी केले आहे. आतिशी यांनी केलेल्या ट्विटला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रिट्विट केले आहे. ते म्हणाले की, "पोलिसांना मनीषजींसोबत असा गैरव्यवहार करण्याचा अधिकार आहे का? पोलिसांना असे करण्यास वरुन सांगण्यात आले आहे का?" असे प्रश्न त्यांनी ट्विट करत उपस्थित केले आहेत.

दिल्ली पोलिसांचे प्रत्युत्तर

आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टीकेवर दिल्ली पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आहे. पोलिसांवर केले जाणारे गैरव्यवहाराचे आरोप हा अपप्रचार आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांकडून मनीष सिसोदिया यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून आवश्यक ती सर्व पाउले उचलली आहेत, असे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in