देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा - एकनाथ खडसे

मुंबईहून उपचार करुन परतल्यानंतर ते काल पहिल्यांदा ते जळगाव येथे आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत केलं होतं.
देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा - एकनाथ खडसे
Published on

राज्यात मराठाआरक्षणाचा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यात जागोजागी प्रचार , मोर्चे आणि उपोषण सुरूच आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला शब्द दिला आहे, त्यांनी तो पाळावा व संकटमोचक गिरीश महाजन यांनी मार्ग काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.

हृदयविकाराचा त्रास झाल्याने खडसे यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु होता. मुंबईहून परतल्यावर ते मुक्ताईनगर येथे गेले. आज पहिल्यांदा ते जळगाव येथे आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत केलं.

एकनाथ खडसे म्हणाले की, मी आजारी असताना अनेकांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी होत्या. त्यामुळेच मी यातून बाहेर आलो आहे. जनतेने हे प्रेम माझ्यावर असंच कायम ठेवावं. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना खडसे म्हणाले की ,भुजबळ यांनी ओबीसींचे प्रश्‍न सातत्याने आयुष्यभर मांडले आहे. त्यांनी ओबीसींचे कायमस्वरूपी समर्थन केले आहे. त्यांची भूमिका आजची नाही. त्यांनी ओबीसींसाठी लढा दिला आहे. हे सगळे करत असताना मराठा समाजाविषयी द्वेषाची भावना असण्याचे काही कारण नाही. आपल्या समाजाविषयी आदर बाळगला पाहिजे, परंतु दुसऱ्या समाजाविषयी दुस्वास असता कामा नये, ही भूमिका राजकारणात प्रत्येकाने पाळली पाहिजे, असं मला वाटतं.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याची मुदत दिली आहे. याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, की मराठा समाजाला आज निर्णय घेतो, उद्या निर्णय घेतो, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळेस दिले होते. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आपण राजकारण सोडू, असा शब्द फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे त्यांनी तो शब्द पाळावा. शिवाय मराठा समाजाच्या अपेक्षा निश्‍चित उंचावलेल्या आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने भूमिका घेणे फार गरजेचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in