उद्धव ठाकरेंनी केलेल्या 'त्या' टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी सोडले मौन ; म्हणाले, "त्यांची मानसिक स्थिती..."

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी देखील पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
उद्धव ठाकरेंनी केलेल्या 'त्या' टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी सोडले मौन ; म्हणाले, "त्यांची मानसिक स्थिती..."

ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ( १० जुलै) नागपूर येथे एका भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांना 'कलंक' म्हटलं होतं. यावर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी देखील पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील वातावरण 'कलंक' या शब्दावरुन तापलं असताना उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मी कलंक शब्द वापरला त्यात चुकीचं काय बोललो? तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मंत्रिमंडळात घेतलं. मी वापरलेला कलंक शब्द इतका प्रभावी आहे, असं वाटलं नव्हतं. असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक होत उत्तर देत आहेत. आता यावर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरं तर मला या गोष्टीचं अत्यंत दु:ख आहे की, आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणाम झाल्याचं दिसतं. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

एखादी व्यक्ती अशा मानसिकतेतून बोलत असेल तर त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य आहे असं मला वाटत नाही. कारण त्यांची मानसिक स्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहीजे. मला त्यांच्या मानसिक स्थितीवर, व्यवहारावर दया येते. त्यांनी एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला हवं. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in