राष्ट्रवादी सोबत आल्याने पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मला सध्या ब्रेक घेण्याची गरज असल्याचं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या
राष्ट्रवादी सोबत आल्याने पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या एका मोठ्या गटासह भाजपशी हातमिळवणी केली आहे. यानंतर शिंदे गटासह भाजमध्ये अनेकजण नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्यासह शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये पंकजा मुंडे यांचे बंधू तसंच राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांचा देखील समावेश आहे. यामुळे पंकजा मुंडे यांची काँग्रेस प्रवेशाची चर्चा जोर धरु लागली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, मी राजकारणात ज्या विचारधारेला डोळ्यासमोर ठेवून पुढे आली. त्या विचारधारेशी तडजोड करावी लागल्यास किंवा प्रतारणा करावी लागल्यास मी राजकारणातून एक्झिट घ्यालया मागे पुढे पाहणार नाही. यावेळी बोलताना त्या सध्या मला एक ब्रेकची आवश्यकता असून तो मी घेणार असल्याचं त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी पंकजा मुंडे भाजपमध्ये असल्याचं म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या भूमिकेविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असून त्या सातत्याने पक्षाचे काम करत राहतील. आमच्या पक्षातील काहींचा राष्ट्रवादीविरोधात कायमच संघर्ष राहिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोबत आल्यावर काहींची नाराजी होणं स्वाभाविक आहे. मात्र, यावर संबंधित नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. पंकजा मुंडे या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या मनातील जाणून घेऊ. पक्षाचे वरिष्ठ नेते पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करतील. त्या भाजपमध्ये असून सातत्याने काम करत राहतील, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या भूमिकेवर दिलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in