जळगाव : काँग्रेसचे माजी खासदार आणि विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांचे सोमवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. तसे पत्र सोमवारी दुपारी डॉ. उल्हास पाटील यांना प्राप्त झाले. या पत्रावर बोलताना काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोप डॉ. उल्हास पाटील यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना केला. काँग्रेसमध्ये निलंबनानंतर दुसरीकडे जाण्याची शक्यता त्यांनी यावेळी बोलून दाखवली. मात्र भाजप सूत्रांनुसार डॉ. पाटील हे बुधवारी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांना, त्यांची पत्नी डॉ. वर्षा पाटील व जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र मराठे यांना सोमवारी दुपारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र मिळाले. डॉ. उल्हास पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या गेले काही दिवस येत होत्या. एका दैनिकात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याची बातमी आली होती. तिचा संदर्भ घेत हे निलंबन झाल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले; मात्र डॉ. उल्हास पाटील यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत निलंबनाचे पत्र केवळ एका ओळीचे असून, कारण माहीत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी १९९०पासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. पक्षाच्या अनेक आंदोलनांत मी सहभागी झालो आहे. आपणावर केलेली कारवाई ही क्लेशदायक असून, दु:ख देणारी आहे. हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. सध्या पक्षात एकाधिकारशाही सुरू आहे, त्याचा हा परिणाम असावा. निलंबनाबाबत माझ्याबरोबर याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पक्षातून काढल्याने आता मला दुसरा विचार करावा लागेल. देवेंद्र मराठे यांना नियमाप्रमाणे काढता येत नाही, त्यांना काढले हे देखील चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
डॉ. उल्हास पाटील यांची कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांबाबत बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींची भूमिका, त्यांच्या नेतृत्वात देशाची वेगाने होत असलेली वाटचाल, त्यांची कार्यपद्धती, कार्यशैली ही तिला आवडते. ती कोणत्याही पक्षाची सदस्य नसल्याने तिला कोणत्याही पक्षात जाण्याचा अधिकार आहे. आपण आता भाजपमध्ये प्रवेश करणार काय? या थेट प्रश्नाला उत्तर देण्याचे त्यांनी टाळत दोन दिवसांनंतर सांगेन, असे मोघम उत्तर दिले; मात्र भाजप सूत्रांनुसार बुधवारी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. पाटील आणि त्यांची कन्या डॉ. केतकी व पत्नी डॉ. वर्षा, आणि देवेंद्र मराठे यांचा भाजपप्रवेश होत आहे. जिल्ह्यात अगोदरच अस्तित्व नसलेल्या काँग्रेसला हा एक धक्का आहे.