घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईतील रोड शो असो वा त्यांनी वाराणसी येथे भरलेला उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रसंग, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली होती.
घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईतील रोड शो असो वा त्यांनी वाराणसी येथे भरलेला उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रसंग, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली होती. इतक्या महत्त्वाच्या वेळी अजितदादा अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले होते. कारण आजपर्यंत जितक्या वेळा अजितदादा ‘नॉट रिचेबल’ झाले, त्या त्यावेळी राजकीय भूकंप झालेला आहे. मात्र, आता त्यांच्या पक्षाकडूनच त्यांच्या अनुपस्थितीबाबत खुलासा करण्यात आला आहे. अजितदादा ‘नॉट रिचेबल’ही नाहीत आणि नाराजही नाहीत, त्यांना घशाचे इन्फेक्शन झाले असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र, ते शुक्रवारपासून प्रचारात सहभागी होतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

अजितदादा हे दोन दिवस महत्त्वाच्या सभा किंवा प्रसंगांना उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नाराज तर नाहीत ना, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर अजितदादांनी नाराजी व्यक्त केली होती. याचाही संदर्भ या चर्चांना होता. मात्र, आता पक्षानेच अजितदादा यांना घशाचे इन्फेक्शन झाल्याचे स्पष्ट केले आहे.

काँग्रेसने जे आरोप केले आहेत ते योग्य नाहीत. अजितदादा यांच्यासारख्या ‘मास लीडर’ नेत्याला प्रचारापासून बाजूला ठेवून कोण स्वतःचे नुकसान करून घेईल.

सुरक्षेच्या कारणास्तव दुर्घटनास्थळी मोदींनी भेट देणे शक्य नव्हते

लोकसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे देशभर सुरू आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन काटेकोरपणे केलेले असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने घाटकोपर दुर्घटनेच्या ठिकाणी त्यांना भेट देण्याची परवानगी दिली गेली नाही. यापूर्वी देशाने दोन पंतप्रधान सुरक्षेच्या कारणास्तव गमावलेले आहेत. म्हणून सुरक्षा यंत्रणा काळजी घेत असते आणि त्यामुळेच प्रचाराचा कार्यक्रम सोडून तिथे भेट देणे मोदींना शक्य झाले नाही. असे सांगून उमेश पाटील यांनी, येत्या अधिवेशनात बेकायदेशीर होर्डिंगसंदर्भात कायदा बनवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस करेल, असे स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in