भुजबळांच्या घरी पेढे खायला, तर पटेलांच्या घरी जेवायला जाऊ; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

सत्तेत सामिल होणाऱ्यांच्या किंवा भाजपला शरण जाणाऱ्यांच्या चौकशा थांबवल्या जातात, असा आरोप विरोधी पक्षांकडून नेहमी केला जातो. यावरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
भुजबळांच्या घरी पेढे खायला, तर पटेलांच्या घरी जेवायला जाऊ; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि राष्ट्रवादीचे दोन गट झाले. अजित पवार गटाने भाजप प्रणित शिंदे सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होणारे आरोप आणि चौकश्या थांबल्याचं दिसत आहे. अशात आता महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जाऊन आलेले आणि ईडीची चौकशी सुरु असलेले मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीने मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावरील खटला उच्च न्यायालयातून मागे घेतला. न्यायायलायाने देखील याला मान्यता दिली आहे. यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोपरखळी मारली आहे. भुजबळांच्या घरी पेढे खाण्यासाठी जाव लागले आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जेवणासाठी जाऊ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

सत्तेत सामिल होणाऱ्यांच्या किंवा भाजपला शरण जाणाऱ्यांच्या चौकशा थांबवल्या जातात, असा आरोप विरोधी पक्षांकडून नेहमी केला जातो. यावरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर मिश्किलपणे टिप्पणी केली. याप्रकरणी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस आनंदाचा आहे. आम्ही छगन भुजबळ यांच्याकडे पेढे खाण्यासाठी जाणार आहोत. ईडीने भुजबळांवरील चौकशी बंद केली आहे. काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर जामीनावर बाहेर आहात अशी दमदाटी केल्यानंतर भुजबळांनी आता काय चमत्कार केला हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत, असं ते म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांना देखील टोला लगावला.प्रफुल्ल पटेल यांच्याघरी आम्ही जेवायला जाणार आहोत. पण, त्यांना विनंती करणार आहोत की मिर्ची कम जेवण द्या, ते पुढे म्हणाले, भुजबळांना अशी कोणती जडीबुटी मिळाली, असा कोणता बाबा मिळाला आणि चमत्कार झाला. त्यामुळे ईडी मागे गेली. ही जडीबुटी सगळ्यांना दे अशी प्रार्थाना मी देवाकडे करतो, सर्व खोटेपणा सुरु आहे. वाटेल तेव्हा बदनाम करायचं, त्यांच्याकडे आलं की त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यायचं. हे उघड-उघड थोतांड सुरु आहे.हे आमचं हिंदूत्व नाही. त्यांचं थोतांड हिंदूत्व आम्हाला मान्य नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ आणि त्याचा पुतण्या माजी खासदार समिर भुजबळ यांच्यावर गुन्हा ईडीने मागे घेतला असला तरी भुजबळ यांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यावर गुन्हा मात्र कायम आहे.

logo
marathi.freepressjournal.in