जयंत पाटलांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स; प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले...

'आयएल अँड एफएस' प्रकरणाशी काही संबंधित काही आरोपी कंपन्यांनी जयंत पाटील यांच्याशी संबंधित संस्थांना कमिशन रक्कम दिल्याचा आरोप
जयंत पाटलांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स; प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी कडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे. यापूर्वी त्यांना ११ मे रोजी ईडीकडून पहिल्यांदा समन्स बजावण्यात आला होता , तसंच आज (१५ मे ) रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, दोन दिवसावर जवळच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने पाटील यांनी ईडीला वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावत २२ मे रोजी चौकशीसाठी हजर राह्यण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान ईडीने 'आयएल अँड एफएस' प्रकरणाशी काही संबंधित काही आरोपी कंपन्यांनी जयंत पाटील यांच्याशी संबंधित संस्थांना कमिशन रक्कम दिल्याचा आरोप केला असून त्यासंबंधी पाटील यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच त्यांचे जबाब नोंदवले जाणार असल्याचे ईडीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, ईडीकडून करण्यात आलेले आरोप पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. ईडीने पाठवलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले कि, ''ज्या 'आयएल आणि एफएस' कंपनी प्रकरणात ईडीने मला नोटीस बजावली आहे, त्या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. जिथे रुपयाचा व्यवहार नाही, काही देणं घेणं नाही, तरी देखील ईडीने नोटीस बजावली आहे. ईडी नोटीस का काढते हे देशाला माहिती आहे. " अशी प्रतिक्रिया पाटील यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, "११ मे ला माझ्या लग्नाच्या वाढदिवशी मला ईडीची पहिली नोटीस मिळाली. त्या नोटीसमध्ये काय उल्लेख आहे, मी ते देखील नीट वाचले नाही. माझ्या मुंबईच्या घरी एका हवालदाराने ही नोटीस दिली. मी या कंपनीशी कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही. मला कर्ज काढायला आवडत नाही, माझे तसे धोरण नाही, मी त्या कंपनीच्या दाराशी कधी गेलो नाही, मी कोणत्याही दबावाशिवाय काम करतो, मला कोणत्याही नोटीसीची चिंता नाही." असे देखील पाटील यांनी यावेळी म्हटलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in