नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले आहे. तरीही मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ईव्हीएम’वरून सुरू असलेले ‘महाभारत’ थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असा दावा आंतरराष्ट्रीय उद्योगपती इलॉन मस्क यांनी केला आहे. त्याचीच री ओढत भारतातील ईव्हीएम म्हणजे ब्लॅक बॉक्स असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे, तर भारतात ‘ईव्हीएम’ हॅक होऊ शकत नाही, असा ठाम दावा भारतीय निवडणूक आयोगाने केला आहे, तर इलॉन मस्क यांनी आपल्याकडे शिकवणी लावावी, असे आव्हान माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिले.
ईव्हीएम हा ब्लॅक बॉक्स
आंतरराष्ट्रीय उद्योगपती एलन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) शंका उपस्थित केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही तोच मुद्दा उचलून धरला आहे. ईव्हीएम हा ब्लॅक बॉक्स असून त्याची छाननी करण्याची कोणालाही अनुमती नाही. भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे सांगितले.
निवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत.
तसा तो यावेळीही करण्यात आला होता. ईव्हीएममुळे देशातील निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया धोक्यात येत असल्याचा मुद्दा विरोधक सातत्याने मांडत होते. आता राहुल गांधी यांनी ईव्हीएमबाबत मुद्दा उपस्थित करून समाजमाध्यमावर त्याबाबत पोस्ट टाकल्याने मतदान यंत्रे हा पुन्हा एकदा चर्चेचा मुद्दा झाला आहे.
जेव्हा एखादी संस्था आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाही तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याचीच शक्यता असते, असे मतही राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. एलन मस्क यांच्याच एका पोस्टवर रिपोस्ट करीत राहुल गांधी यांनी मत व्यक्त केले आहे आणि मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून अत्यल्प मतांनी विजयी झालेले उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा दाखलाही दिला आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उबाठा उमेदवार पराभूत झाल्यानंतर जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पेरण्याचे काम सुरू झाले आहे. ईव्हीएम मशीन मोबाईलला जोडले होते, मोबाईलने ईव्हीएम अनलॉक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात ईव्हीएम मशीन कुठल्याही मोबाईलला जोडता येत नाही. राहुल गांधी परदेशातील टेक्नॉलॉजीवर भाषणे देतात. त्यांना माहिती नाही का? असा सवाल शिंदे गटाचे उपनेते संजय निरूपम यांनी केला आहे. रवींद्र वायकरप्रकरणी विरोधक धडधडीतपणे खोटे आरोप करत असल्याचे निरूपम म्हणाले. मतदान केंद्रात कोणाचा मोबाईल होता याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.
सीसीटीव्ही फुटेज खूप महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगाचे ते सीसीटीव्ही फुटेज हे सेंटर इन्चार्ज असतील त्यांना देणार, मात्र प्रत्येक माणसाला सीसीटीव्ही फुटेज देऊ शकत नाही. नेमका मोबाईल कोणाचा होता, अधिकाऱ्यांचा मोबाईल होता की मेहुण्याचा होता हे स्पष्ट झाले पाहिजे. मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाणं चुकीचं काम आहे. कोणी वापरला असेल तर तो वेगळा विषय आहे. मोबाईल वायकरांच्या मेहुण्याचा होता की नाही याचा तपास व्हावा. मोबाईल नेमका कोणाचा होता हे लवकरच कळेल, असेही निरूपम म्हणाले.
ईव्हीएम फ्रॉडप्रकरणी कोर्टात जाणार - आदित्य ठाकरे
एलॉन मस्क भारतात आल्यास निवडणूक आयोग त्यांना अटकही करू शकते, असे वक्तव्य आमदार आदित्य ठाकरे यांनी केले आहे. निवडणुकीत ईव्हीएमचा फ्रॉड झालेला आहे. आम्ही कोर्टात जाणार, आम्ही ही लढाई लढणार आणि जिंकणार, असा विश्वासही त्यांनी केला आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघाबद्दल आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. हा विषय लावून धरलेला आहे. या सगळ्या संदर्भात आम्ही सुद्धा कोर्टात जाणार आहोत. निवडणुकीत ईव्हीएमचा फ्रॉड झालेला आहे. या सगळ्यासंदर्भात निवडणूक आयोग समोर आलेला आहे. आम्हीही लढाई लढणार आणि जिंकणार.
‘एआय’कडून ईव्हीएम हॅकिंग शक्य - मस्क
एलन मस्क यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट टाकून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कृत्रिम प्रज्ञा (एआय) अथवा मानवाकडून हे यंत्र हॅक केले जाऊ शकते, अशी शक्यता मस्क यांनी वर्तविली होती आणि ईव्हीएमचा वापर टाळण्याची सूचना केली होती. अमेरिकेच्या निवडणुकीतील एका अपक्ष उमेदवाराने ईव्हीएमबाबत एक पोस्ट टाकली होती, त्यावरूनच मस्क यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मस्कची शिकवणी घेण्यास तयार - चंद्रशेखर
एलन मस्क यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. मस्क यांची टिप्पणी ही खूपच वरवरची आणि सामान्य आहे. कुणीच सुरक्षित हार्डवेअर तयार करू शकत नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र हे साफ चूक आहे. मस्क यांची शंका अमेरिका आणि इतर देशांत कदाचित खरी ठरत असेल. पण भारतात ईव्हीएममध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. यात सुरक्षिततेचे सर्व उपाय आहेत. भारतासारखेच ईव्हीएम इतर लोकही बनवू शकतात. आम्ही त्यांना हवे असल्यास त्यासाठी शिकवणी वर्ग घेऊ शकतो, असा टोला राजीव चंद्रशेखर यांनी लगावला.
ईव्हीएम मोबाईलला कनेक्ट होतच नाही; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा केवळ ४८ मतांनी विजय झाला आहे. ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला आहे. त्यावरून आता जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ईव्हीएम मोबाईलवर आलेल्या ओटीपीने अनलॉक करण्यात येते, असेही या दरम्यान सांगण्यात आले आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी ईव्हीएम हे स्वतंत्र यंत्र असून त्याला कोणतीही मोबाईल कनेक्टिव्हीटी नसल्याचे स्पष्ट केले आहे. ईव्हीएम हॅक करता येत नाही. ईव्हीएम प्रोग्रॅमेबल नसून ईव्हीएमचा ओटीपी नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर-पश्चिम मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी झाले. ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला. त्यानंतर आता दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकारपरिषद घेऊन याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली.
रवींद्र वायकर यांच्या नातलगाने मतदान केंद्रावर मोबाईलचा वापर केल्याचा आरोप होत आहे. त्यावर, मुंबई सांगण्यात आले. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर मोबाईल घेऊन जाणे या दोघांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वायकर यांच्यासह त्यांच्या नातेवाईक आणि निवडणूक अधिकाऱ्यांविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध १८८, ३४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मतदान केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजची तपासणी सुरू असून लवकरच पोलीस त्यांचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे.