
गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होतना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या चाळीस आमदारांसोबत केलेल्या बंडानंतर भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी देखील काही आमदारांना सोबत घेत मंत्रीपदाची शपत घेतली. यानंतर राष्ट्रवादीचा उर्वरीत गट देखील सत्तेत सामील होणार असल्याच्या चर्चा सुरु असतात. आता काँग्रेसचे काही आमदार भाजपसोबत जाणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्याने चर्चांना उधान आलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, काँग्रेसचे काही आमदार आमच्याकडे येतील, आम्ही सर्वपक्षीय सरकार स्थापन करत आहोत. राणे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. त्यांचा या विधानानंतर वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, इंडिया आघाडीत ३० पक्ष एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार एकत्र आले तर काय फरक पडणार? ते तिघे होते तेव्हा काही करु शकले नाही. आता तर दोघांचे तीन झाले आहेत. पुढे चार होतील. मात्र, यामुळे काहीही होणार नाही. आता काँग्रेसचेही काही आमदार आमच्याकडे येतील. आम्ही सर्वपक्षीय सरकार स्थापन करत आहोत, असं राणे म्हणाले.
काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडी पाहता, सर्वत्र गोंधळाती स्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे, त्यानंतर अजित पवार आणि आता काँग्रेसमध्ये नेमकं कोण? राज्यात पुन्हा एकदा राजकीय भुकंप होणार का ? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.