संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर फडणवीसांनी गाठली दिल्ली; केंद्रात मंत्रिपद मिळणार?

लोकसभा निवडणूक निकालाचे आता जोरदार पडसाद महायुती आणि भाजपमध्ये उमटत आहेत.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसFPJ

मुंबई : लोकसभा निवडणूक निकालाचे आता जोरदार पडसाद महायुती आणि भाजपमध्ये उमटत आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून मोकळे करण्याची पक्षाला विनंती करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नागपूरमार्गे दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत ते पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राज्यातील पराभवाची कारणमीमांसा आणि राजीनाम्याची तयारी या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच अन्य छोटे-मोठे पक्ष सोबत घेऊन महायुतीने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. लोकसभा निकालात महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला. महायुतीला १७ तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. एका जागेवर काँग्रेसचा बंडखोर उमेदवार निवडून आला. तर भाजप २३ जागांवरून ९ जागांवर आला. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना लोकसभा निवडणुकीचे निकाल महायुती विशेषतः भाजपसाठी धक्कादायक आहेत.

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटनेत काम करता यावे म्हणून पक्षाने आपल्याला सरकारमधून मोकळे करावे, अशी विनंती त्यांनी पक्षाला केली आहे. यानंतर भाजपमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमार्गे दिल्ली गाठली. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी फडणवीसांसोबत सुमारे दोन तास चर्चा केली. त्यानंतर फडणवीस दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत ते पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, फडणवीसांच्या पद सोडण्याच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सक्रिय झाला आहे. तसेच दिल्लीत फडणवीसांना बोलावणे आल्याने येत्या काही दिवसांत राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार हे निश्चित मानले जात आहे.

फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद?

काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन करण्याची तयारी वेगाने सुरू केली आहे. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी मला उपमुख्यमंत्रीपदावरून मोकळे करा, असे आवाहन पक्षाला केले होते. आता फडणवीस यांना राज्यातून कायमस्वरूपी दिल्लीत आणले जाणार असल्याचे समजते. त्यांना मोदी मंत्रिमंडळात मंत्री किंवा पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधानांच्या नवीन टीममध्ये माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर यांचा समावेश केला जाण्याची जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान व प. बंगालमध्ये समन्वय साधण्यावर पक्षाने जोर दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in