देशात पहिल्या पाच टप्प्यांत ५०.७२ कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांत एकूण ७६.४१ कोटी पात्र मतदारांपैकी ५०.७२ कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी आकडेवारी शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली.
देशात पहिल्या पाच टप्प्यांत ५०.७२ कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
@ANI
Published on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांत एकूण ७६.४१ कोटी पात्र मतदारांपैकी ५०.७२ कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी आकडेवारी शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली.

पहिल्या टप्प्यात १६.६४ कोटी मतदारांपैकी ११ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण टक्केवारी ६६.१४ इतकी होती. दुसऱ्या टप्प्यात १५.८६ कोटी मतदारांपैकी १०.५८ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण टक्केवारी ६६.७१ इतकी होती.

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात १७.२४ कोटी पात्र मतदारांपैकी ११.३२ कोटी मतदारांनी मतदान केले. एकूण टक्केवारी ६५.६८ इतकी होती. चौथ्या टप्प्यात १७.७१ कोटी मतदारांपैकी १२.२५ कोटी मतदारांनी मतदान केले. एकूण टक्केवारी ६६.७१ इतकी होती. तर पाचव्या टप्प्यात ८.९६ कोटी मतदारांपैकी ५.५७ कोटी मतदारांनी मतदान केले. एकूण टक्केवारी ६२.२० इतकी होती, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

ईसी'कडून मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी जाहीर

निवडणूक आयोगाने (ईसी) शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांत मतदारसंघनिहाय किती मतदान झाले त्याची आकडेवारी जाहीर केली. खोटी माहिती पसरवून निवडणूक प्रक्रिया दूषित करण्याचा आता एक नवा पायंडाच पडला आहे. मतदानाच्या आकडेवारीमध्ये फेरफार करणे अशक्य आहे, असेही आयोगाने म्हटले आहे.

मतदान केंद्रनिहाय किती मतदान झाले त्याची आकडेवारी संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणारी एका स्वयंसेवी संस्थेने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर निवडणूक आयोगाने शनिवारी स्वत:हून आकडेवारी जाहीर केली.

लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये एकूण किती मतदार आहेत त्या माहितीचा समावेश करून मतदारांच्या आकडेवारीची माहिती अधिक व्यापक करण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in