नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ५८ मतदारसंघांत रात्री आठ वाजेपर्यंत अंदाजे एकूण ५९.०६ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पश्चिम बंगालच्या जंगल महाल प्रदेशात सर्वाधिक म्हणजे ७८.१९ टक्के इतके मतदान झाले आहे.
पश्चिम बंगालपाठोपाठ झारखंड (६२.७४ टक्के), उत्तर प्रदेश (५४.०३ टक्के), ओदिशा (६०.०७ टक्के), जम्मू-काश्मीर (५२.२८ टक्के), बिहार (५३.३० टक्के), हरयाणा (५८.३७ टक्के) आणि दिल्लीत ५४.४८ टक्के इतके मतदान झाले.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्वच्या सर्व म्हणजे सात, हरयाणा (१०), बिहार (आठ), झारखंड (चार), उत्तर प्रदेश (१४), ओदिशा (सहा) आणि पश्चिम बंगालमध्ये आठ जागांसाठी मतदान झाले. ओदिशामध्ये लोकसभा निवडणुकीसमवेत विधानसभेच्या ४२ मतदारसंघांतही मतदान झाले.
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यात १ जून रोजी ५७ मतदारसंघांत मतदान होणार असून मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.