
देशातील चार राज्यांमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या १६ जागांसाठी आज मतदान होत आहे. या १६ जागांपैकी सहा जागा महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवार उभे राहिल्याने साधारणपणे बिनविरोध होत असलेल्या या निवडणुकीसाठी मतदान होईल. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे; पण आमच्याच आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणार असा विश्वास महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना, शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना आणि काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार उभे राहिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे मानले जात आहे. भाजपने तिसरा उमेदवार उभा केल्याने निवडणूक लादली गेली असल्याचा आरोप विरोधकांनी भाजपवर केला आहे. या निवडणुकीत काय होणार याचा निकाल आजच लागेल. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना येत्या २० जून रोजी होत असलेल्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचे चार उमेदवार सहजपणे निवडून येणार आहेत; पण भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार सहजपणे निवडून येणार आहेत. काँग्रेसने दोन उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना तिकीट दिलेले नाही. तसेच शिवसेना -भाजप सरकारमध्ये परिवहनमंत्री असलेले दिवाकर रावते यांनाही शिवसेनेने उमेदवारी दिलेली नाही. भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेतील विरोधी नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, प्रदेश भाजपचे सरचिटणीस श्रीकांत भारतीय, महिला मोर्चाच्या नेत्या उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे; पण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना आणि विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. विनोद तावडे यांना केंद्रीय जबाबदारी देण्यात आली असल्याने विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाचा विचार झाला नसावा; पण विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पक्षाने पंकजा मुंडे यांचा विचार केला नाही. प्रदेश भाजपने त्यांना उमेदवारी देण्यात यावी म्हणून प्रयत्न केले; पण सर्व निर्णय केंद्राकडून घेण्यात येत असल्याने त्यांच्या नावाचा समावेश झाला नाही, असे स्पष्टीकरण प्रदेश भाजप नेत्यांकडून करण्यात आले. भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्यावरून भाजपपेक्षा अन्य पक्षांकडूनच ‘सहानुभूती’ व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांना भाजपने संधी द्यायला हवी होती, असे म्हटले. आपणास विधान परिषदेसाठी संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करीन, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी अलीकडेच केले होते. तर ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ अशी भावना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत होती. २०१९च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होईल, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती; पण विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार भाजप नेतृत्वाकडून झाला नाही. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या सचिन अहिर यांना आणि शिवसेना नंदुरबार जिल्हाप्रमुख अमशा पाडवी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. पाडवी हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे के. सी. पाडवी यांनी त्यांचा पराभव केला होता. भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवार उभे केल्याने या जागांसाठीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजारास वाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीचे निकाल कसे लागतात, याचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीवर होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. विधान परिषदेसाठी उभे असलेले आपले उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी, जुळवाजुळव सुरू आहे. कोणाचे डावपेच, रणनीती यशस्वी होणार हे २० जून रोजी निकाल लागल्यानंतरच दिसून येईल. भाजपची की महाविकास आघाडीची खेळी यशस्वी झाली, हे त्यानंतरच दिसून येणार आहे.