महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांच्या नावाला पसंती दिली आहे. आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात थेट लढत होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना संधी दिली आहे. मात्र, महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार दिला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या अर्ध्या तासात महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत राजन साळवी यांच्या नावाला अखेर मंजुरी देण्यात आली.
राजन साळवी यांच्याकडे नुकतेच शिवसेनेचे उपनेतेपद देण्यात आले आहे. ही निवडणूक आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात सामील झाले, तर राजन साळवी हे निष्ठावंत म्हणून शिवसेनेत राहिले. त्यामुळेच त्याला ही संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. साळवी यांचा अर्ज भरताना बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुनील प्रभू उपस्थित होते. साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. 2009 पासून सलग तीन वेळा त्यांनी राजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.