गडकरीही होऊ शकतात पंतप्रधान, मोदींच्या नेतृत्वावरून ‘एनडीए’त धुसफूस झाल्यास संघाचा ‘प्लॅन बी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षापेक्षा मोठे असल्याचे व्यक्तिकेंद्रित राजकारण भाजपला लोकसभा निवडणुकीत चांगलेच महागात पडले आहे. मोदींचा करिष्मा ओसरल्याचे लोकसभा निकालावरून स्पष्ट झाले आहे.
गडकरीही होऊ शकतात पंतप्रधान, मोदींच्या नेतृत्वावरून ‘एनडीए’त धुसफूस झाल्यास संघाचा ‘प्लॅन बी’
संग्रहित फोटो

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षापेक्षा मोठे असल्याचे व्यक्तिकेंद्रित राजकारण भाजपला लोकसभा निवडणुकीत चांगलेच महागात पडले आहे. मोदींचा करिष्मा ओसरल्याचे लोकसभा निकालावरून स्पष्ट झाले आहे. भाजपला स्वबळावर बहुमत न मिळाल्याने एनडीएतील मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. मात्र, मोदी-शहा जोडगोळीच्या हेकेखोर नेतृत्वावरून एनडीएत धुसफूस झाल्यास मवाळ व सर्वमान्य नेतृत्व म्हणून नितीन गडकरींचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येऊ शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यादृष्टीने ‘प्लॅन बी’ तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही काळात मोदी व शहा हे संघाला गृहित धरत असल्याचे चित्र दिसून येत होते. भाजप हा संघापेक्षा वरचढ बनल्याचे चित्र तयार करण्यात आले होते. त्यामुळे संघातूनही मोदी-शहा यांच्या नेतृत्वाबाबत अस्वस्थता व नाराजी आहे. गडकरींचे संघाशी चांगले संबंध आहेत. तसेच इतर पक्षांतील नेत्यांशींही त्यांचे चांगले संबंध असल्याने भाजपला सरकार स्थापण्यात काही अडचण आल्यास गडकरींचे नाव संघाकडून पंतप्रधानपदासाठी पुढे केले जाऊ शकते.

महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट होत असताना नागपूर लोकसभा मतदारसंघातून मात्र भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल १ लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. नितीन गडकरी हे भाजपचे एकमेव असे नेते आहेत, ज्यांच्या नावाला ठाकरे गटासह काही विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो. महाराष्ट्रातील मराठी व्यक्ती पंतप्रधान होत असले तर शिवसेना ठाकरे गट पुन्हा एनडीएसोबत जाऊ शकतो. यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या एकूण मनसुब्यांवर पाणी फेरता येऊ शकते, असा विचारही संघ वर्तुळात सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in