राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते तथा मंत्री गिरीष महाजन यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवा नाही. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता गिरीष महाजन यांनी खडसेंवर टीका करताना त्यांना पक्षातून हाकलून लावलं असल्याचं विधान केलं आहे. एकनाथ खडसे यांचा राजीनामा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला नव्हता, तर पक्षात राहून त्यांनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले होते, त्यामुळे त्यांना पक्षाने हाकलून दिले, दाऊदच्या संभाषणामुळे आपल्याला पक्षातून काढलं असे एकनाथ खडसेंनी समजण्याची गरज नाही. एकनाथ खडसेंनी ज्या फोटोवरुन आरोप केलेत ते दहा वर्षांपूर्वी कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरुंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो आहेत. एकनाथ खडसे सध्या मानसिक तणावात आहेत, अशी खोचक टीका गिरीष महाजन यांनी केली आहे.
ते म्हणाले, भोसरी भूखंड प्रकरण गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेल्या नोटीसमुळे एकनाथ खडसे यांची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. काय बोलावं हे आता खडसेंना कळत नाही. त्यामुळे वाटेल ते बेछूट आरोप ते करत आहेत. त्यांच्या आरोपांना आम्ही किंमत देत नाहीत. एकेकाळी ते आमच्या सोबत असल्याने आमचे सहकारी होते. मात्र, आता त्यांची कीव करावी वाटत नाही. एकनाथ खडसे यांच्यामुळे त्यांच्या घरच्या लोकांनाही भोगावं लागेल, ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.
मंत्री गिरीश महाराज यांच्या नाशिक येथील लग्नातील एका व्हायरल फोटोवरुन खडसे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. गिरीष महाजन हजर असलेल्या या लग्नात काही आक्षेपार्ह लोक हजर असल्याचा आरोप महाजन यांच्यावर करण्यात आला होता. यावर आम्ही सर्व विवाह सोहळ्याला उपस्थित होतो हे मान्य करतो. मात्र, आपल्याला त्याबद्दल काही कल्पना नाही.हा नवीन विषय नाही. यापूर्वी देखील यावर चर्चा झाली आहे. वैफल्यग्रस्त परिस्थितीमुळे काहीतरी बोलायचं म्हणून अशा प्रकारे आरोप केले जात आहेत. खडसेंची परिस्थिती वैफल्यग्रस्त झाल्याने ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बडबड करत असतात, असंही महाजन म्हणाले.