'गोकुळ' उभारणार विज बचतीसाठी सौरउर्जा प्रकल्प, सोलापूर जिल्ह्यात १८ एकरावर सौरऊर्जा प्रकल्प, वर्षाला होणार अंदाजे साडेसहा कोटींची बचत

गोकुळच्या वीज बिलामध्ये वर्षाला तब्बल साडेसहा कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.
'गोकुळ' उभारणार विज बचतीसाठी सौरउर्जा प्रकल्प, सोलापूर जिल्ह्यात १८ एकरावर सौरऊर्जा प्रकल्प, वर्षाला होणार अंदाजे साडेसहा कोटींची बचत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) ने सोलर ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगा वॅट कपॅसिटीचा सौरऊर्जा प्रकल्प मु.पो.लिंबेवाडी ता.करमाळा जि.सोलापूर येथे मे.सार्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे यांच्या वतीने उभा करण्यात आलेल्या सोलर पार्कमध्ये स्वतःची १८ एकर जागा खरेदी करून हा प्रकल्प उभारत असल्याची व यामुळे गोकुळच्या वीज बिलामध्ये वर्षाला तब्बल साडेसहा कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.

गोकुळ दूध संघाने विविध माध्यमातून बचतीचे धोरण अवलंबले असून, संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या बाबींमध्ये बचत करता येईल याचा विचार पुढे आल्यानंतर वीज बिलांच्या बचतीसाठी सौर उर्जेचा पर्याय समोर आला. यातूनच मग सौरऊर्जा प्रकल्पासाठी उपयुक्त अशा भौगोलिक स्थितीचा सविस्तर अभ्यासाचा अहवाल अभियांत्रिकी विभाग प्रमुखांच्याकडून घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर संबंधित कंपनीशी करार करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात १८ एकरावर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोकुळचे वीजे पोटी वर्षाला खर्च होणारे तब्बल साडेसहा कोटी रुपये वाचणार आहेत.

ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून पूर्ण करून देण्यासह जमीन खरेदीची रक्कम असा हा ३३ कोटी ३३ लाख रुपयांचा प्रकल्प आहे. यातून निर्माण होणारी वीज मंडळाला पुरवल्यानंतर गोकुळला सध्या प्रतियुनिट येणारा खर्च १० रुपया ऐवजी ३ रुपये येणार असून, ही वार्षिक बचत साडेसहा कोटीवर जाणार आहे. याच हिशोबाने केवळ पाच वर्षांमध्ये या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च वसूल होणार आहे. यासाठी राष्ट्रीय डेअरी डेव्हपमेंट बोर्डाकडे गोकुळ ने २५ कोटी ४७ लाख रुपये कर्जाची मागणी केली असून, त्याचे हप्ते या बचत झालेल्या रकमेतून अदा केले जाणार आहेत. सदर सौर ऊर्जा प्रकल्पाचा जागेसह खर्च रुपये ३३ कोटी ३३ लाख इतका होणार आहे व या प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये ६.५० कोटी इतकी बचत होणार आहे. याची निविदा प्रकल्प झाली असून, ३१ जुलै २०२४पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाऊन ऑगस्ट २०२४ पासून प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होणार आहे.

बचतीसाठी उचलले नवे पाऊल

महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या ओपन ॲक्सेस स्कीममधून अशा पद्धतीची सौरऊर्जा निर्माण करून ती वीज मंडळाला पुरवली जाणार असून त्याबद्दल्यात वीज मंडळ गोकुळच्या वीज बिलांचा दर कमी करणार आहे. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी जवळ २०० एकरवर पुणे येथील सार्जन रिॲलिटी प्रा.लि.ही कंपनी सौर ऊर्जा निर्मिती करत आहे यापैकी गोकुळ १८ एकर जागा खरेदी करून याठिकाणी या कंपनीमार्फत सोलर पार्कमधून रोज साडेसहा मेगावॅट वीज निर्मिती गोकुळ करणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in