विशेष प्रतिनिधी/मुंबई
राज्यातील मराठी माणूस एकत्रित राहू नये, यासाठी बाहेरून जोरदार प्रयत्न सुरू असून, हा मराठी माणसांच्या विभाजनाचा फार मोठा कट आहे. यासाठी गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. सध्या ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, ते पाहता महाराष्ट्राचे तुकडे व्हायला काहीही वेळ लागणार नाही. त्यातून आपले अस्तित्व कसे संपविले, याचा अंदाजही येणार नाही, अशी भीती व्यक्त करतानाच आता मराठी माणसाने अलर्ट राहिले पाहिजे, असे मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
मनसेच्या सहकार शिबिराचे शनिवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात काय चालले आहे, हे सारा समाज उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. इथे जाती-जातींत भांडणे लावली जात आहेत. मराठी माणूस एकत्र राहू नये, यासाठी बाहेरून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील सर्व चांगले बाहेर काढा. निघत नसतील, तर उद्ध्वस्त करा, असे त्यांचे धोरण आहे. पण जमिनीचा तुकडा हे तुमचे अस्तित्व आहे. आतापर्यंत जगात जमिनीसाठीच युद्ध झालेली आहेत. पूर्वी जमिनीसाठी युद्ध होत; मात्र, आता तर गुपचूप जमिनी घेतल्या जात आहेत. शिवडी न्हावाशेवा सागरी मार्गाच्या आजूबाजूची जमीन गेली, तेदेखील कळले नाही. रायगडमध्ये हीच परिस्थिती होणार आहे. या जिल्ह्याला मोठा धोका आहे. अर्थात, पालघर, ठाणे, रायगड हातातून जात आहे. संपूर्ण कोकणपट्टीलाच धोका आहे. त्यामुळे आता सतर्क राहण्याची गरज आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही सडकून टीका केली. राज ठाकरे पुढे म्हणाले की, आता गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. आपली महानंद डेअरी अमूल गिळंकृत करतो की काय, अशी परिस्थिती आहे. आपल्याला इतिहासातून बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील. वर्तमान हातातून कधी निघून जाईल, याचा अंदाजही येणार नाही. मराठवाड्यात दुष्काळी स्थिती त्यामुळे तेथील पाणी पातळी खोल गेली आहे. पण येथे साखर कारखाने उभे करण्याचा सपाटा सुरू आहे. कारखान्याला पाणी जास्त लागतो. पण याचा कुणीही विचार करायला तयार नाही. त्यामुळे मराठवाड्याचे वाळवंट होईल. तसे झाल्यास जमीन पूर्ववत व्हायला ४०० वर्षे लागतील.
सध्याचे सरकार सहारा चळवळ
राज्यात सहकार चळवळ मोठी आहे. मात्राचे आताचे सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही, तर सहारा चळवळ आहे, अशी टीका करतानाच महात्मा जोतिबा फुले यांनी सहकार चळवळ उभी केली. जमिनी श्रीमंताच्या घशात जाऊ नये, म्हणून त्यांनी पहिले आंदोलन केले. आता जमिनी लुटण्याचा धंदा सुरू केला आहे. त्यामुळे कोकणवासीयांनी सावध राहावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.