"ते थकलेले मुख्यमंत्री होते, JDU 2024 मध्ये संपेल"; तेजस्वी यादवांची नितीश कुमारांवर टीका

मला त्यांच्यावर कोणतीही व्यक्तिगत टीका करायची नाही. आम्ही संयमीपणे आघाडीधर्माचे पालन केले. मी लोकांना...
"ते थकलेले मुख्यमंत्री होते, JDU 2024 मध्ये संपेल"; तेजस्वी यादवांची नितीश कुमारांवर टीका

संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत महाआघाडी तोडत आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळे राष्ट्रीय जनता दलाकडून नितीश कुमार यांच्यावर टीका केली जात आहे. आम्ही त्यांच्याकडून काम करुन घेतले. हे थकले होते. थकलेले मुख्यमंत्री होते. माझ्या मनात कोणताही राग नाही. आम्ही अत्यंत संयमीपणे आघाडीधर्माचे पालन केले. मी जे म्हणतो, ते करतो. तुम्ही लिहून घ्या, जनता दल युनायटेड पक्ष 2024 मध्ये संपेल, असा दावा राष्ट्रीय दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.

"मला त्यांच्यावर कोणतीही व्यक्तिगत टीका करायची नाही. आम्ही संयमीपणे आघाडीधर्माचे पालन केले. मी लोकांना एक सांगू इच्छीतो, अजून खेळ बाकी आहे. मी सांगतो ते करतोच, जनता दल युनायटेड पक्ष हा 2024 मध्ये संपेल. जनता आमच्या सोबत आहे. भाजपच्या लोकांनाही जनता दल युनाटेडला त्यांच्या सोबत घेतल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे तेजस्वी यादव म्हणाले. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

'इंडिया' आघाडी संपली असा प्रश्न तेजस्वी यांना विचारला असता, इंडिया आघाडी मजबूत असल्याचे ते म्हणाले. यानंतर त्यांना नितीश कुमार यांनी, "मरेल पण पुन्हा भाजपसोबत जाणार नाही", असे म्हटले होते असा प्रश्न विचारला गेला. यावर तेजस्वी यांनी, आपण यावर जास्त का बोलायचे, यावर जनता उत्तर देईल. जे होते चांगल्यासाठी होते, असे उत्तर दिले.

रोहिणी आचार्य यांनीही केली सडकून टीका-

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यादेखील सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी नितीश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

नितीश कुमारांवर निशाणा साधताना रोहिणी यांनी़, "कचरा पुन्हा कचऱ्याच्या डब्ब्यात गेला, 'कचरा - मंडळी'ला दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या शुभेच्छा!", अशी पोस्ट करत सोबत कचरागाडीचा फोटो जोडला आहे. एका पोस्टमध्ये, 'उसके साथ रहना बेकार है, जिसकी विचारधारा गिरगिट कुमार है' असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी लालू यादव यांचे 2017 चे ट्विट देखील पुन्हा शेअर केले ज्यामध्ये लालूंनी नितीश यांना साप म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in