राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपशी हातमिळवणी केली. यानंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या या शपथविधीला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर शरद पवार यांच्या बॅनरवर फोटो लावण्यावरुन दोन्ही गटात शाब्दीक चकमकी देखील घडल्या. शरद पवार यांच्याकडून तसंच अजित पवार गटाकडून मुंबईत कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या.
मुंबईत अजित पवार गटाच्या पार पडलेल्या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आधी भाजपसोबत जाण्यास नकार दिला नंतर शिवसेनेसोबत कसे गेले? असा प्रश्न अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी त्यांच्या वाय बी चव्हाण येथे झालेल्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उत्तर दिलं आहे.
तुम्ही शिवसेने बरोबर गेलात आम्ही भाजपसोबत गेलो काय बिघडल. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, शिवसेनेचं हिंदुत्व आहे पण ते लपवून ठेवत नाही. शिवसेनेचं हिंदुत्व अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणारं हिंदुत्व असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर भाजपच्या हिंदुत्वाविषयी देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे. भाजपचं हिंदुत्व हे विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. तसंच ते माणसामाणसात अंतर वाढवणारं द्वेश वाढवणार आहे. असं शरद पवार यांनी म्हटलं.
भाजपविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, ज्यामुळं समाजाच्या ऐक्याला तडा जातो. जो जाती धर्मात अंतर वाढवतो तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. त्यामुळे जो राष्ट्रप्रेमी नाही त्याच्यासोबत जाण्याची भूमिका आम्ही घेणार नाही, असं स्पष्ट मत शरद पवार यांनी भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवर मांडलं.