"मी हिंदू-मुस्लिम करणार नाही, हा माझा संकल्प..." पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी, १४ मे रोजी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला
"मी हिंदू-मुस्लिम करणार नाही, हा माझा संकल्प..." पंतप्रधान मोदींचं वक्तव्य
Published on

नवी दिल्ली : "ज्या दिवशी मी हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहू शकणार नाही. मी हिंदू-मुस्लिम असे कधीच करणार नाही, हा माझा संकल्प आहे", असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१४ मे) काशी येथे केले. पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गंगा मातेची पूजा केली. यानंतर मोदी क्रूझवर गेले आणि तिथे उपस्थित असलेल्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की, तुम्ही मुस्लिमांचा उल्लेख जास्त मुलांना जन्म देणारे आणि घुसखोर असा केला का?" या प्रश्नावर मोदींनी प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले?

"मला विश्वास आहे की, माझ्या देशातील जनता मला मत देईल. ज्या दिवशी मी हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहू शकणार नाही आणि मी हिंदू-मुस्लिम करणार नाही, हा माझा संकल्प आहे", असे मोदी म्हणाले.

मी असे म्हणालो नाही...

मोदी पुढे म्हणाले, जास्त मुलांना जन्म देणाऱ्यांचे नाव म्हटले की, मुस्लमानांशी जोडले जाते, याचे मला आश्चर्य वाटते. आपल्या इथे गरीब कुटुंबात देखील ही अवस्था आहे. ते त्यांच्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. कोणत्याही समाजाचे असू देत, जिथे गरीबी आहे, तिथे मुलांची संख्या जास्त आहे. मी जास्त मुलांना जन्म मुस्लीम देतात असे ना मुस्लीमांना, ना हिंदूंना कधी म्हणालो. मी एवढे म्हटले की, तुम्हाला एवढे मुले असावे की, ज्यांचे तुम्ही पालनपोषण करू शकता. सरकारला मुलांची देखभाल करावी लागेल, अशी स्थिती निर्माण करू नका."

logo
marathi.freepressjournal.in