प्रेमाने मागितले असते, तर सगळे दिले असते! सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेला, नेते गेले. प्रेमाने मागितले असते, तर सगळे दिले असते. काही अडचण नव्हती. पण, ओरबाडण्यात काही मजा नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवारी लगावला.
प्रेमाने मागितले असते, तर सगळे दिले असते! सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर पलटवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेला, नेते गेले. प्रेमाने मागितले असते, तर सगळे दिले असते. काही अडचण नव्हती. पण, ओरबाडण्यात काही मजा नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवारी लगावला. मंत्रीपदाची संधी मलाही होती. पण, निष्ठा महत्त्वाची आहे. माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडून ठेवायला ताकद लागते, असेही त्या म्हणाल्या.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी मंचर (ता. आंबेगाव) येथे सुप्रिया सुळे यांची सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या की, मुलगा किंवा मुलगी दोघेही जबाबदारी आणि कर्तृत्व दाखवू शकतात. लोक मला म्हणतात, हे कसे झेलता. एवढ्या घट्ट कशा झाल्या? जबाबदारी पडल्यानंतर माणूस घट्ट होतो. बाहेर पडल्यानंतर बोलता येते. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. पक्ष फुटून दहा महिने झाले, किती दिवस तेच ते करायचे, मी जुन्यामध्ये रमत नाही. माझा काल मी बदलू शकत नाही. पण, उद्या बदलू शकते. त्यामुळे काय झाले, कोण काय बोलले, कशाला बोलले, यात रमायचे नाही. जबाबदारी स्वीकारायची आणि कामाला लागायचे.

दिल्लीतील मोठे लोक राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात भ्रष्ट पार्टी असल्याचे सांगत होते. शरद पवार यांना ‘भटकता आत्मा’ म्हणत आहेत. आता भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करत नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राष्ट्रवादीला मुक्त केल्याबद्दल भाजपचे आभार मानते. आता कन्याप्रेमामुळे पक्षात अडचण आल्याचे सांगत आहेत. कन्या प्रेमाच्या आरोपाचे मला वाईट वाटत नाही, पण भ्रष्टाचाराच्या आरोपाचे वाईट वाटत होते. पण, त्या आरोपातून भाजपने मुक्त केले, असा टोमणा त्यांनी मारला.

डॉ. अमोल कोल्हे यांनी कांदा आणि बैलगाडा शर्यतीचा प्रश्न सोडविला. महायुतीच्या एकाही खासदाराने कांद्याच्या दराबाबत भाष्य केले नाही. कांद्याला हमी भाव मागितल्याने आमचे निलंबन झाले. केंद्र सरकार शेतकरी, कामगारविरोधी आहे. त्यामुळे हे सरकार बदलले पाहिजे. हवा सोडून सर्व गोष्टीवर त्यांनी वस्तू व सेवा कर लादला. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला आहे. शिवाजीराव आढळराव हे आपली शेवटची निवडणूक आहे, असे सांगत आहेत. ही त्यांची शेवटची निवडणूक असेल, तर पाच वर्षांत हे काहीच काम करणार नाहीत. त्यामुळे योग्य उमेदवाराला संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केली.

तुलना केल्यास सत्य लक्षात येईल

कोणाला काय आणि किती मिळाले याची तुलना केल्यास सत्य लक्षात येईल. माझी राजकीय कारकीर्द पाहा आणि दादाची राजकीय कारकीर्द पाहा. त्याची तुलना केल्यास तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार काय म्हणाले

मी जर साहेबांचा मुलगा असतो, तर मला यापूर्वीच संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नसल्याने मला संधी मिळाली नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता.

फडणवीसांनी केले अजितदादांचे समर्थन

अजित पवारांनी शरद पवारांबरोबर पक्ष उभा केला. मात्र, नंतर त्यांनाच पक्षातून बाहेर पडावे लागले. आपल्याला पक्ष मिळणार नाही, आपल्याला पक्षात स्थान नाही, हे त्यांच्या वेळीच लक्षात आले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in