पोलिसांच्या समन्सकडे दुर्लक्ष करा! प. बंगाल राज्यपालांची राजभवन कर्मचाऱ्यांना सूचना

महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगाच्या तक्रारीसंदर्भात आलेल्या पोलिसांच्या कोणत्याही समन्सकडे दुर्लक्ष करा, अशा सूचना पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी रविवारी राजभवनच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
File Photo
File PhotoFPJ

कोलकाता : महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगाच्या तक्रारीसंदर्भात आलेल्या पोलिसांच्या कोणत्याही समन्सकडे दुर्लक्ष करा, अशा सूचना पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी रविवारी राजभवनच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

राजभवनाच्या एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने शुक्रवारी कोलकाता पोलिसांकडे राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली. राज्यपालांच्या विरोधातील महिलेच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी कोलकाता पोलिसांनी चौकशी पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून, ते राजभवनाच्या कर्मचाऱ्यांची तपासणी करणार आहेत. तपास पथक राजभवनमधील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचाही विचार करत आहे.

पोलीस राज्यपालांविरुद्ध कारवाई करू शकत नसल्याचा केला दावा

या पार्श्वभूमीवर राज्यपाल बोस यांनी एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्य पोलीस राज्यपालांविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत. त्यांच्या पदाच्या कार्यकाळात कोणत्याही न्यायालयाकडून त्यांना अटकेचे आदेश जारी केले जाऊ शकत नाहीत. राज्य यंत्रणा राज्यपालांविरुद्ध कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई करू शकत नाही.

logo
marathi.freepressjournal.in