इंडिया आघाडीही बनवू शकते सरकार; तृणमूल, टीडीपी व जेडीयूला सोबत घेतल्यास बदलू शकते चित्र

लोकसभेच्या ५४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मतमोजणीच्या ट्रेंडनुसार एनडीएला २९० जागा मिळाल्या आहेत, तर इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या आहेत व इतरांना १९ जागा मिळाल्या आहेत.
इंडिया आघाडीही बनवू शकते सरकार; तृणमूल, टीडीपी व जेडीयूला सोबत घेतल्यास बदलू शकते चित्र

नवी दिल्ली : लोकसभेच्या ५४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मतमोजणीच्या ट्रेंडनुसार एनडीएला २९० जागा मिळाल्या आहेत, तर इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या आहेत व इतरांना १९ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा २७२ आहे. भाजपला मागील निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळाले होते. मात्र, यावेळी भाजपला केवळ २४० जागा मिळाल्या असून ते स्वबळावर बहुमत मिळवू शकलेले नाहीत. एनडीएतील मित्रपक्षांच्या मदतीनेच भाजपला सरकार स्थापन करता येणार आहे. त्यामुळे ‘एनडीए’तील भाजपचे मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसम व जेडीयूला इंडिया आघाडीने आपल्याकडे वळवल्यास बहुमताचे गणित भाजपसाठी कठीण बनू शकते. ३० जागा जिंकलेल्या तृणमूलने यापूर्वीच इंडिया आघाडीला गरज पडल्यास पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने चाणक्य नीती वापरल्यास सत्तेचे गणित त्यांनाही जुळवता येऊ शकते.

नरेंद्र मोदी व अमित शहा जोडीने सत्तेच्या दुसऱ्या टर्ममध्ये ‘हम करे सो कायदा’ ही कार्यपद्धती अवलंबल्याने भाजपमध्ये तसेच अन्य पक्षांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो. काही मित्रपक्ष यामुळे भाजपपासून दूर जाऊ शकतात.

इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी त्यांना ३९ जागा कमी पडत आहेत. अशा स्थितीत बहुमतासाठी विद्यमान इंडिया आघाडीला आघाडीच्या बाहेरही काही भागीदार शोधावे लागतील.

बिहारमध्ये नितीश यांच्या जेडीयूने १५ जागा जिंकल्या आहेत. जानेवारी २०२४ मध्ये भाजपने जेडीयूसोबत सरकार स्थापन केले. मात्र, त्यापूर्वी नितीश हे राजद आणि काँग्रेसच्या युती सरकारचे प्रमुख होते. नितीश यांनीच पाटणा येथे इंडिया ब्लॉकची पहिली बैठक आयोजित केली होती. अशा परिस्थितीत, जर इंडिया ब्लॉकने नितीश यांना चांगले पद दिल्यास ते इंडिया आघाडीत परत येऊ शकतात.

इंडिया आघाडीसाठी दुसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे तेलुगु देसम, २०१९ मध्ये चंद्राबाबू नायडू यांनी पहिल्यांदाच सर्व विरोधी पक्षांना एनडीए सरकारच्या विरोधात एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला १६ जागा मिळाल्या आहेत. जर नितीश व नायडू हे दोन नेते एनडीएपासून वेगळे झाले तर एनडीएकडे २६५ जागा राहतील, त्यामुळे ते बहुमताच्या आकड्यापासून ७ जागांनी दूर राहतील.

नितीश व नायडू यांच्या पक्षाच्या मिळून ३१ जागा होतात, तसेच इतर निवडून आलेल्या १९ जणांपैकी ८-१० जणांचा पाठिंबा मिळवल्यास इंडिया आघाडीला सरकार बनवणे शक्य होऊ शकते.

जेडीयू, टीडीपीशी संपर्क साधण्याबाबत आज निर्णय घेणार - राहुल गांधी

केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून जेडीयू आणि टीडीपी यासारख्या माजी सहकाऱ्यांशी संपर्क साधावयाचा की नाही, याबाबतचा निर्णय बुधवारी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घेतला जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. माजी सहकाऱ्यांशी संपर्क साधणार का, असा प्रश्न गांधी यांना विचारण्यात आला होता.

आमच्या सहकारी पक्षांशी चर्चा केल्याविना आम्ही या घडीला काहीही सांगू शकत नाही, आमची आघाडी बुधवारी निर्णय घेईल आणि जो निर्णय होईल त्यानुसार आम्ही पावले उचलू, असेही गांधी म्हणाले. ही निवडणूक घटनेचे रक्षण करण्यासाठी होती आणि देशातील गरीब आणि मागासवर्ग जनतेने घटनेच्या रक्षणासाठी साथ दिली, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in