मंगळवार १३ जून रोजी राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रात शिंदे गटाची एक जाहिरात छापून आली. या जाहिरातीत एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचं एका सर्वेच्या हवाल्यानं सांगण्यात आलं होतं. तसंच 'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' असा मजकूर देखील या जाहिरातीवर छापण्यात आला होता. सध्या या जाहिरातीची राज्यभर चर्चा सुरु आहे. यावरुन भाजप-सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. तसंच दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडल्याचं देखील सांगितलं जात आहे.
या जाहिरातीवरुन भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली होती. "बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही. ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही", अशा खोचक शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. अनिल बोंडे यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले आणि संजय गायकवाड यांनी बोंडे यांना त्यांच्याच शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
शिंदे गटाचे नेते भर गोगावले यांनी बोंडे यांना प्रत्युत्तर देत, बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल, असा इशाराच दिला आहे. तसंच ते म्हणाले की, "माझी उपमुख्यमंत्र्याशी या विषयावर चर्चा झाली आहे. त्यांना त्या लोकांना तिथूनच फोन करायला सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही आता त्या खोलात शिरत नाही. याचा वरच्या स्तरावर विचार केला जाईल. बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल." अशा शब्दात गोगावले यांनी अनिल बोंडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
अनिल बोंडे यांनी केलेली टीका शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते आक्रमक भाषेत व्यक्त होताना दिसून येत आहेत. शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी देखील बोंडे यांच्या टीकेला अत्यंत कडक भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे हे वाघ असून या ५० वाघांमुळेच भाजपाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे नसते तर महाराष्ट्रात भाजपची काय औकात होती? या भाषेत गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
या विषयी बोलताना गायकवाड म्हणाले की, जनतेला एखाद्या मुख्यमंत्र्याचं काम पटत असेल आणि जनता कौतूक करत असेल तर ते पचवायची ताकद राजकीय नेत्यांमध्ये असायला हवी. एकनाथ शिंदे राज्यात काम करत आहेत. त्यांना बेडकाची उमा देणं किंवा ते ठाण्यापुरते मर्यादित आहेत असं म्हणणं चुकीचं आहे, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. तुम्ही पूर्वी किती मर्यादित होता, महाराष्ट्रात तुम्ही कोणाच्या संगतीनं मोठे झालात? याचा विचार केला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरुन तुम्ही राज्यात मोठे झालात, ते नसते तर महाराष्ट्रात तुमची काय औकात होती? हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल तसंच त्यांच्या नेत्यांबद्दल बोलताना अनिल बोंडे यांच्यासारख्या खासदारनं आत्मचिंतन करुन बोलायला हवं, असं देखील संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. यावरुन सेना-भाजपातील अंतर्गत कलह वाढत असल्याचं बोललं जात आहे.