बिगूल वाजणार! लवकरच पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता

पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून 26 मे रोजी ही याबाबतची सर्व तयारी पुर्ण झाली असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवणार आहे
बिगूल वाजणार! लवकरच पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता

पुण्यात दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी आता लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता दिसून येत आहे. यासाठीच्या तयारीला निवडणूक आयोगाकडून सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हा निवडणूक विभागाने देखील 17 दिवसांपूर्वी या कामाला सुरुवात केली होती, ती तयारी आता पुर्णत्वास आली आहे. यात मतदान याद्या अद्यावत करुन मतदान केंद्रांचे स्थान ठरवणे ही कामे होती. त्यामुळे आता होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्नाटकची निवडणूक पार पडताच तेथील इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पुण्याला रवाना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच 4,220 ईव्हीएम मशीन आणि 5,070 व्हीव्हीपॅट मशीन पुण्यात रवाना झाल्या आहेत. 30 इंजिनियर्सची तुकडी या मशिन्सची सेटिंग आणि चेकिंग करायला लावली असून ही प्रक्रिया देखील पुर्ण झाली आहे. या मशीवर पुणे बाय इलेक्शन्स असी स्टिकर्स लावलेली निदर्शनास आली आहेत.

पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून 26 मे रोजी ही याबाबतची सर्व तयारी पुर्ण झाली असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक कधी होणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

29 मार्च रोजी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. 2024 साली होणाऱ्या लोकसभेच्या सर्वसाधारण निवडणुकीस एक वर्षाचा काळ बाकी आहे. नियमानुसार एखादी रिक्त झालेली जागा सहा महिन्याच्या आत निवडणूक घेऊन भरणे आवश्यक आहे. मात्र, निवडणूक आयोगाने जर पावसाळ्याचे कारण देत निवडणूका पुढे ढकलल्या तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीला खुपच कमी वेळ उरेल या आयोग या निवडणुका रद्द करण्याचा देखील निर्णय घेऊ शकतो. मात्र, आयोगाने केलेली तयारी बघता निडणूक लवकर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

या निवडणुकीत अनेक जण इच्छूक असल्याचे बघायला मिळत आहे. भाजपकडून या निडणुकीत पाच नावांची चर्चा आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संजय काकडे आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यापैकी एका जणाला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसकडून मोहन जोशी, अरविंद शिंदे आणि रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या जागेवर आपला दावा सांगितला असल्याने महाविकास आघाडीत या जागेवरुन वाद होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in