बोरवणकरांच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करा, नाना पटोले यांची मागणी

चौकशीपर्यंत अजित पवारांना कार्यमुक्त करा
बोरवणकरांच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करा, नाना पटोले यांची मागणी

मुंबई : माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता, असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी केला आहे. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांची उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत अजित पवार यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे केली.

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर या पुस्तकात पुण्यातील येरवडा येथे पोलिसांच्या घरासाठी असलेल्या जागेवर पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री दादांचा डोळा होता. त्यांनी या जागेचा लिलाव करून जवळच्या बिल्डरला जागा मिळवून देण्याचा घाट घातला होता, असा दावा केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी या दाव्याचा इन्कार केला असताना बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांचे नाव घेऊन आरोप केला

या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मीरा बोरवणकर यांनी येरवड्याची पोलीस विभागाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा तत्कालीन पालकमंत्र्यांचा प्रयत्न होता हा जो आरोप केला आहे, त्यावर सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारणाच आहेत. पण चौकशी करा अशी मागणी केली तर सरकारच सरकारची चौकशी कशी करणार? त्यामुळे या प्रकरणात ‘दाल में कुछ काला है’, असे नाहीतर सर्व डाळच काळी आहे.

अजित पवार यांनी त्यांच्या जवळचा बिल्डर शाहीद बलवाला सरकारी जमीन द्यावी म्हणून आपल्यावर कसा दबाव आणला हे बोरवणकर यांनी पुस्तकात लिहिले होतेच . पण आज पत्रकार परिषद घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करत गंभीर आरोप केले आहेत. सरकारमध्ये जर काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फतच या प्रकरणी चौकशी केली पाहिजे तरच सर्व सत्य बाहेर येईल, असेही पटोले यांनी सांगितले.

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आरक्षणचा प्रश्न मार्गी लावेल

दरम्यान राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही त्यांनी कोणत्याच समाजाला आरक्षण दिलेले नाही. त्यांनी या समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना होईल आणि आरक्षणचा प्रश्नही मार्गी लावेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in