मनसेचे उमेदवार उशिरा पोहोचले; अर्ज न भरताच परतले!

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत संपल्याने मनसेचे अधिकृत उमेदवार जनार्दन परशुराम पाटील यांना अर्ज न भरताच परतावे लागले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे संग्रहित छायाचित्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे संग्रहित छायाचित्र
Published on

कर्जत : कर्जत विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या निर्धारित वेळेत नामांकन अर्ज भरता आला नाही. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत संपल्याने मनसेचे अधिकृत उमेदवार जनार्दन परशुराम पाटील यांना अर्ज न भरताच परतावे लागले. काही काळ थांबून मनसेच्या कार्यकर्त्यांना नामनिर्देशन पत्र न भरताच परतावे लागल्याने मनसैनिक नाराज झाले.

कर्जत मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामांकन अर्ज दाखल करण्यास पाच मिनिटे शिल्लक असून आणि त्यानंतर पुन्हा एकदा कार्यालयाच्या बाहेर येवून तीन वाजले असल्याचे जाहीर करीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय जाधव यांनी ध्वनिक्षेपक वरून मुदत संपली असल्याचे जाहीर केले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचे दार आतमधून बंद करण्यात आले. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात दोन अपक्ष उमेदवार हे नामांकन अर्ज भरण्यासाठी हजर होते.

मात्र साधारण तीन वाजून तीन मिनिटांनी मनसेचे उमेदवार जनार्दन परशुराम पाटील हे कार्यकर्त्यांसह जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील तसेच अन्य कार्यकर्ते हे तेथे पोहचले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनाबाहेर असलेले पोलीस यांनी मुदत संपल्याने दालन बंद झाले असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in