लहरी राजा असेच निर्णय घेणार, नोटबंदीवरुन संजय राऊत यांची मोदींवर टीका

देशात कुठेही मोदी किंवा भाजपाच्या विरोधात निकाल लागला तर असे निर्णय घेतले जातात हा इतिहास आहे. 2,000 ची नोट चलनातून बाद करणे हा देखील त्यातीलच एक प्रकार आहे.
लहरी राजा असेच निर्णय घेणार, नोटबंदीवरुन संजय राऊत यांची मोदींवर टीका

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या देशाला लहरी राजा लाभला असल्याचे म्हणत 2,000 च्या केलेल्या नोटबंदीवर टीका केली आहे. देशात कुठेही मोदी किंवा भाजपाच्या विरोधात निकाल लागला तर असे निर्णय घेतले जातात हा इतिहास आहे. 2,000 ची नोट चलनातून बाद करणे हा देखील त्यातीलच एक प्रकार आहे. लहरी राजा असेच निर्णय घेणार हे गृहीत धरुनच आपण 2024 चा कार्यकाळ ढकलणार आहोत, असा टोला देखील त्यांनी यावेळी मोदींना लगावला.

कर्नाटकात भाजपचा अत्यंत दारुण पराभव झाला असून देशाची सध्याची मानसिकता काय आहे हे दाखवून देणारा हा निकाल आहे. कर्नाटक हे दक्षिण भारतातील एक महत्वाचे राज्य आहे. या भागात सर्वात प्रखर असे हिंदुत्व पाहण्यास मिळते. तसेच कर्नाटकात सर्वात जास्त मंदिरे असून तेथील लोक देखील श्रद्धाळू आहेत. कर्नाटकात हिंदूंचे सर्वाधिक सण, उत्सव साजरे केले जातात. या हिंदूत्ववादी राज्याने नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपचा पराभव केला आहे. हे सत्य भाजप का स्वीकारत नाही? असा सवाल राऊत करत असाच पराभव तुमच्या वाटेला येणार आहे, असे राऊत यांनी भाजपला उद्देशून म्हटले आहे.

भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, मुंबई, ठाण्यासह राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत तु्म्ही का दाखवत नाही? मोदी, शहा यांच्यापैकी कोणालाही प्रचाराला येऊदेत, अन्य कोणालाही येऊदेत. इथे तंबू ठोकून जरी बसलात तरी आमचे काही म्हणणे नाही. फक्त निवडणुका घ्या हीच आमची मागणी आहे. त्यानंतर जनमत कुणाच्या बाजूने असून कुणाला किती जागा मिळतात ते कळेल, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे.

यावेळी महाविकास आघाडीतील जागावाटपाविषयी त्यांनी महत्वाचे भाष्य केले. जागा वाटप करताना तीन पक्षांमध्ये समन्वय साधावा लागेल. तडजोड देखील करावी लागेल हे सत्य आहे. भाजप सोबत असतानाही आम्ही तडजोडी केल्या आहे. आता देखील करु, त्यावेळी आम्ही तडजोडी केल्या त्याचा फायदा भाजपने घेतला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मात्र, आम्ही 19 चा आकडा कायम ठेवू असे विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in