लालू यादव यांचा राहुल गांधी यांना सल्ला ; भर पत्रकार परिषदेत म्हणाले, "अजूनही वेळ..."
केंद्रातील भाजप सरकारला सतत्तेतून पायउतार करण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकजूट करायला सुरुवात केली आहे. आज देशातील विरोधी पक्षांची एक बैठक बिहारची राजधानी पटणा येथे पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आपल्या जून्या अंदाजात पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी बोलताना अनेक कोपरखळ्या मारल्या. यावेळी राहूल यांना त्यांनी एक सल्ला दिला. लालू यांनी दिलेला सल्ला ऐकून बैठकीला उपस्थित सर्वांना हसू फुटले.
या पत्रकार परिषदेवेळी लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची स्तूती केली. तसंच ते चांगल काम करत असल्याची पोचपावती देखील दिली. लालू यांनी यावेळी उद्योगपती गौतम अदामी यांच्यावर देखील टीका केली. ही पत्रकार परिषद रंगात असताना लालू यांनी राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय काढला. यावेळी त्यांनी राहुल यांनी लग्न करायला हवं, असं त्यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितलं.
यावेळी लालू म्हणाले की, राहुल गांधी यांनी आता लग्र करायला हवं. अजूनही वेळ गेलेली नाही. सोनिया गांधी सांगतात की राहुल त्यांचं ऐकत नाही. यावेळी त्यांनी राहुल यांना म्हटलं की जर तु्म्ही लग्न केलं तर आम्ही सर्व वरातीत सहभागी होऊ असं लालू म्हणाले आहेत. लालू यांचा सल्ला ऐकताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. लालू यांनी दिलेल्या सल्ल्यावर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे. "तुम्ही सांगत आहात तर लग्नही होईल", असं राहुल गांधी म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत देशभरातील १५ विरोधी पक्ष सहभागी झाले होते. बिहारची राजधानी पटणा येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.