मुंबईचा आवाज संसदेत 'असा' घुमणार,नवशक्तिच्या परिसंवादात उमटले मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब!

FPJ Mumbai Debate: मुंबई प्रेस क्लब, प्रजा फाउंडेशन, इंडियन मर्चंट्स चेंबर आणि दि फ्री प्रेस जर्नल-नवशक्ति यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (८ मे रोजी) मुंबईतील चर्चगेट येथील इंडियन मर्चंट्स चेंबरच्या वालचंद हिराचंद सभागृहात 'मुंबई निवडणूक परिसंवादा'चे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईचा आवाज संसदेत 'असा' घुमणार,नवशक्तिच्या परिसंवादात उमटले मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब!
FPJ

मुंबई प्रेस क्लब, प्रजा फाउंडेशन, इंडियन मर्चंट्स चेंबर आणि दि फ्री प्रेस जर्नल-नवशक्ति यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (८ मे रोजी) मुंबईतील चर्चगेट येथील इंडियन मर्चंट्स चेंबरच्या वालचंद हिराचंद सभागृहात 'मुंबई निवडणूक परिसंवादा'चे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील सहा मतदारसंघ व त्यातील समस्या, सर्वसामान्य मुंबईकरांच्या अपेक्षा आणि विविध पक्षांच्या उमेदवारांचे त्यावरील मत यावर या परिसंवादात प्रामुख्याने भर देण्यात आला. परिसंवादाला चोखंदळ मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दि फ्री प्रेस जर्नल-नवशक्ति वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कर्नानी व संचालक अभिषेक कर्नानी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ही तर हुकूमशाही!

- अरविंद सावंत, शिवसेना (उबाठा) दक्षिण मुंबई मतदारसंघ

संसदेत लोकप्रतिनिधी कायदे बनवत असतात. पण आज महाराष्ट्रात काय स्थिती आहे? आज आपण ज्या प्रश्नांवर चर्चा करत आहोत त्यापैकी अनेक थेट महापालिकांशी निगडित आहेत. पण दोन वर्षांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. ही हुकूमशाहीच आहे. जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधीच नसतील तर जनतेच्या प्रश्नांना न्याय कसा मिळणार? यावर जनतेसोबतच प्रसारमाध्यमांनीही आवाज उठविला पाहिजे असे अरविंद सावंत म्हणाले.

म्हणून नितीन गडकरींकडील खाते काढले

कोस्टल रोड आता अर्धा पूर्ण झाला आहे. उद्धव ठाकरेंनी हे काम पूर्ण केले. थीम पार्क अदयाप पूर्ण व्हायचे आहे. पण बॅलार्ड पिअर ते शिवडी असा मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचा विकास हे देखील उद्धव ठाकरेंचे स्वप्न होते. तत्कालीन केंद्रीय बंदर विकास मंत्री नितीन गडकरी या प्रकल्पाबददल सकारात्मक होते. मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचा विकास झाला तर या विभागाचे सौंदर्यीकरण तर झाले असतेच पण पर्यटक देखील मोठया प्रमाणात तिथे आकर्षित झाले असते. तेथील जागा डॉकची असल्याने झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न होता. गडकरी सकारात्मक असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाला असता. पण हे खाते नितीन गडकरींकडून काढून घेण्यात आले. गती-शक्तीच्या नावावर हे खाते व इतर खाती एकत्र करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:कडे घेतली. हा प्रकल्प रखडला असेही अरविंद सावंत म्हणाले. संसदेतील १४६ खासदार निलंबित करण्यात आले. त्यावेळीच अनेक विधेयके मंजूर करण्यात आली. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्याचा अधिकार देखील स्वत:कडे घेण्यात आला. आता देखील स्वत:चा गुलामच त्यांनी नेमला अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली.

मे महिन्यात मतदान कशाला?

मे महिन्यात एकतर शाळांना सुटी असते. अनेक मुंबईकर मतदार हे सुटीसाठी बाहेर जात असतात. उन्हाळा देखील असतो. अशा स्थितीत मतदान कशाला, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. मुंबईतील धोकादायक बनलेल्या हजारो इमारती आहेत. त्यांच्याही पुनर्वसनाचा प्रश्न तसाच पडला आहे. एनटीसीच्या जमिनीवरील इमारतींचे पुनर्वसनही केंद्र सरकारनेच रखडविल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला. मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याची आमची मागणी आहे. मात्र अदयापही केंद्र सरकारने या मागणी मंजूर केलेली नाही. राज्यात मोठे प्रकल्प आणत असताना विनाशकारी प्रकल्पांना आमचा विरोधच असेल. पण मोठे प्रकल्प आणायचे असतील तर स्थानिक जनतेचे मत विचारात घ्यावेच लागेल असेही त्यांनी सांगितले.

एकालाही विस्थापित होऊ देणार नाही!

- वर्षा गायकवाड, काँग्रेस उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ

धारावी ही तेथील लोकांनी बनविली आहे. त्यामुळे धारावीचा पुनर्विकास होताना एकाही धारावीकराला विस्थापित होऊ देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील उमेदवार वर्षा गायकवाड यांनी मांडली. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा काही अदाणींसाठी नाही तर सर्वसामान्य धारावीकरांसाठी बनविला आहे. सर्वोच्च न्यायालयाने धारावीतील २०११ सालापर्यंतच्या झोपडयांना संरक्षण दिले आहे. अदाणींना फायदा करून देण्यासाठी विकास नियमावली असेल वा एफएसआय असेल अनेक परवानग्यांमध्ये बदल करण्यात आले. टीडीआरची पॉलिसी देखील तशीच करण्यात आली. धारावीप्रमाणेच अभ्युदयनगर, प्रतिक्षानगर या प्रकल्पांवरही यांचा डोळा आहे. संपूर्ण मुंबई यांना आपल्या हातात घ्यायची आहे. सात लाख धारावीकरांना यांना बाहेर काढायचे आहे. पण एकाही धारावीकराला आम्ही विस्थापित होऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी वर्षा गायकवाड आणि अनिल देसाई यांनी दिली.

पहिल्यांदाच ठाकरेंचे पंजाला मतदान

माझ्या रूपाने पहिल्यांदाच ठाकरे हे काँग्रेसच्या पंजाला मतदान करणार आहेत, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. इतिहास पाहिला तर आम्ही कायम शिवसेनेसोबत संघर्ष केला. पण आघाडी सरकारमध्ये मी मंत्री होते. तेव्हा पहिल्यांदाच जेव्हा उद्धव ठाकरे यांना भेटले तेव्हा त्यांच्या साधेपणामुळे मी अतिशय प्रभावित झाले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मला कायम साथ दिली. आतादेखील उमेदवारी घोषित झाल्यानंतर मी जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सर्वांना वर्षा माझी धाकटी बहिण असल्याचे सांगितले. त्याचा मला अभिमान असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व !

अनिल देसाई शिवसेना (उबाठा) - दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघ

हिंदुत्वाची विचारधारा ही कायमच आहे. ती कधी सोडणारही नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला हिंदुत्व शिकविले आहे. पण त्यांचे हिंदूत्व हे राष्ट्रीयत्व आहे. १९९३ ची दंगल थांबविणारे बाळासाहेबच होते. १९८४ साली देखील मुंबईत एकाही शीख बांधवाला बाळासाहेब होते म्हणूनच हात लागला नाही, असे दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल देसाई म्हणाले. आज शिवसेनेकडे मुस्लीम मतदार देखील मोठया संख्येने येत आहेत. पण हे काही पहिल्यांदाच होत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

मतदारसंघातील धारावी हा मिनी इंडियाच आहे. सर्वधर्मीय लोक इथे राहतात. मराठी,तमिळ,तेलगू असे असंख्य लोक इथे राहतात. एका बाजूला मतदारसंघात टोकाची गरिबी आहे तर दुसऱ्या बाजूला गर्भश्रीमंतदेखील राहतात. या सर्वांचे विविध प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. शिवसेनेने स्थानिय लोकाधिकार समिती स्थापन केली. भूमीपुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समिती काम करते. आजच्या काळातही समिती आवश्यकच आहे. आज दुसरी तिसरी पिढी देखील त्याचा फायदा घेत आहे. समितीच्या माध्यमातून असंख्य लोकांना नोक-या मिळाल्या. त्यांचे भवितव्य घडले. त्यातील अनेकांची मुले आज परदेशातही शिक्षण घेत आहेत असेही त्यांनी सांगितले.

धारावीचा पारदर्शकच विकास हवा

धारावीचा विकास आम्हाला हवा आहेच,त्याच्या विरोधात आम्ही अजिबात नाही. पण विकास करताना प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असायला हवी, असेही अनिल देसाई म्हणाले. आज धारावीत मातीची भांडी, चर्मोद्योग असे शेकडो लघुउद्योग आहेत. अतिशय चांगले कारागिर आहेत. धारावीतील नागरिकांसोबतच या लघुउदयोगांना देखील याच ठिकाणी जागा मिळाली पाहिजे. पण पुनर्विकास होत असताना एकाही धारावीकराला विस्थापित करण्यात येउ नये. तसेच जी विकासप्रक्रिया असेल ती पूर्णपणे पारदर्शकच असायला हवी. विकास आराखडा आधी तेथील स्थानिकांना दाखविण्यात यावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

वर्षा गायकवाड यांची पूर्ण साथ

प्रचारात मला वर्षा गायकवाड यांची पूर्ण साथ मिळत आहे. अगदी कालचाच प्रसंग सांगायचा झाला तर वर्षा गायकवाड त्यांच्या प्रचारासाठी निघत होत्या. मी देखील धारावीत प्रचार करत होतो. ते पाहून वर्षा गायकवाड थांबल्या. त्यांनी माझ्यासाठी त्या सभेत प्रचाराचे भाषणही केले, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

हा माझा ड्रीम प्रकल्प

- राहुल शेवाळे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ

धारावी हे माझे जन्मस्थान आहे आणि खऱ्या रहिवाशांना बदल हवा आहे. ते अधीर झाले आहेत आणि बदलाची आस ठेवून आहेत. विरोधक उमेदवार चुकीची माहिती पसरवत आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा आहे, अदानींचा नाही हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. हा नेहमीच माझा ड्रीम प्रोजेक्ट राहिला आहे आणि तो पूर्णत्वास नेण्याचा माझा निर्धार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना देण्यात आलेला नाही. या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. तो प्रकल्प राज्य सरकारतर्फेच राबवण्यात येणार आहे. मात्र, आघाडीने तो प्रकल्प अदानींना दिला असल्याचे वातावरण तयार केले आहे. ते लोकांची दिशाभूल करत आहेत. सरकारने धारावीतील सर्वेक्षण केले आहे. त्यात अधिकृच रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल. विरोधक बेकादशीर नागरिकांचे नेतृत्व करीत आहेत. जगाला हेवा वाटेल असे धारावीचे मॉडेल आम्ही तयार केले आहे, असे राहुल शेवाळे म्हणाले.

शेवाळे यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी नियोजित मोठ्या प्रकल्पांची रूपरेषा सांगितली. मुंबईतील अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. उड्डाणपूल, कोस्टल रोड, अटल सेतू, पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. गावठाणे, कोळीवाड्यांचे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. माहुल पंपिंग स्टेशन लवकरच मार्गी लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, आम्ही केवळ नियोजन करत नाही तर आम्ही वचन दिलेले प्रकल्प आणि धोरणे राबवत आहोत. “बीडीडी चाळीचा विकास, जो अनेक दशकांपासून रखडलेला होता, आता प्रगती करत आहे आणि आम्ही चाळीतील रहिवाशांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला काही अडथळ्यांचा सामना करावा लागत असला तरी, हे प्रामुख्याने लोकांमधील गैरसमजांमुळे आहेत. पात्र कायदेशीर रहिवाशांना त्यांची हक्काची घरे मिळतील याची खात्री करून सध्या सर्वेक्षण सुरू आहे. रमाबाई नगर परिसरातील १६,५७५ झोपडपट्टीतील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी ३३.१५ हेक्टरचा पुनर्विकास करण्याचा आमचा अलीकडील निर्णय आमच्या वचनबद्धतेची साक्ष देतो.

पुनर्विकासाला प्राधान्य

- यामिनी जाधव, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) दक्षिण मुंबई

जुन्या चाळी, इमारतींचा पुनर्विकास आणि पार्किंग या समस्या म्हणजे मोठे आव्हानच आहे. येथील इमारतींचा स्वतंत्र गृहनिर्माण धोरणानुसार पुनर्विकास होईल. त्यासाठी विकास आराखडा मंजूर झाला आहे. झोपडपट्ट्यांचा प्रश्न एसआरएच्या माध्यमातून मार्गी लावू. मुंबईत गेल्या दोन वर्षात विकासाचे प्रकल्प झपाट्याने मार्गी लागले आहेत. मुंबईच्या विकासावरच भर दिला पाहिजे. आरोग्य, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा आहेतच. पण नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रकल्पांची गरज असल्याचे यामिनी जाधव यांनी सांगितले.

दक्षिण मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनावर चर्चा करताना, जाधव यांनी परिसराच्या भौगोलिक महत्त्वामुळे अधिक कनेक्टिव्हिटीची आवश्यकता अधोरेखित केली. आमचे प्राथमिक लक्ष पुनर्विकासावर आहे. या भागातील अनेक वास्तू जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत, ज्याची केवळ दुरुस्तीच नाही तर संपूर्ण पुनर्बांधणीची गरज आहे. निसर्ग आणि तौक्तेसारख्या चक्रीवादळांमुळे असंख्य इमारतींचे नुकसान झाले आहे. एक आमदार या नात्याने मी या समस्या सातत्याने मांडल्या आहेत.

जाहीरनामा नको, मतदारांच्या सूचना घ्या

प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना जाहीरनामा वितरित करत असताना, यामिनी जाधव यांनी म्हटले की, जाहीरनामे अनावश्यक आहेत आणि उमेदवारांनी त्याऐवजी मतदारांकडून सूचना घेण्यावर भर द्यावा. माझ्याकडे जाहीरनामा नाही आणि त्याची गरज नाही. स्वतःच्या जाहीरनाम्यावर अवलंबून न राहता जनतेच्या जाहीरनाम्यांचा विचार केला पाहिजे. आम्हाला वारंवार भाजपच्या वॉशिंग मशिनची उपमा दिली जाते. मला त्यांना विचारायचे आहे की, ते सर्व निष्कलंक आहेत का? ते कोणते डिटर्जंट वापरतात? त्यांनी त्यांच्या सदस्यांना प्रश्न विचारावा.

महायुतीचे मुंबई दक्षिणचे उमेदवार निश्चित करण्यात उशीर झाल्याबद्दल जाधव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नुकताच उमेदवाराचा निर्णय झाला असला तरी प्रचाराला सुरुवात झाली आहे.

विरोधकांकडे आता विकासाचा कोणताही मुद्दा नाही!

- मिहीर कोटेचा, भाजप उत्तर-पूर्व (ईशान्य) मुंबई मतदारसंघ

विरोधकांकडे विकासाचा कोणताही मुददा नसल्यानेच आता त्यांनी मराठी-गुजराती वाद पेटविण्याचा प्रयत्न केला आहे. माझा जन्म मुंबईचा. मी इथेच मोठा झालो. मला मराठी बोलता, वाचता, लिहिता येते. विधानसभेत मी कायम मराठीतच भाषण करतो. माझ्या आईचा ८१ वर्षांपूर्वी मुलुंडमध्येच जन्म झाला. मग मराठीला विरोध कोण करेल, असे मत भाजपाचे उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्‍य मुंबईतील उमेदवार मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केले.

गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झाल्याचे सांगून मिहिर कोटेचा म्हणाले, मी तरूणपणी युरोपमध्ये गेलो होतो तेव्हा तेथील युरोरेल प्रमाणे आपल्याकडे कधी ट्रेन सुरू होतील असे स्वप्न बघितले होते. आज गेल्या दहा वर्षांत युरोरेलच्या तोडीच्या १०० वंदे भारत एक्सप्रेस देशात सुरू झाल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत देशात ७४ विमानतळे विकसित झाली आहेत. पंतप्रधान मोदी आता देशातील ७५ पेक्षा जास्त वय असलेल्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेत सहभागी करून घेणार आहेत. त्याने पाच लाखांपर्यंतचा कॅशलेस विमा त्यांना मिळणार आहे, असे कोटेचा म्हणाले.

मुंबईत विक्रोळी,मुलुंड आणि मानखुर्द अशी तीन डंपिंग ग्राउंड होती. त्यातील मुलुंडचे बंद झाले आता विक्रोळीचे बंद करायचे आहे. कोकणातील रहिवाशांसाठी कोकण एक्सप्रेस सुरू करणार आहोत. पुढील दहा वर्षांत आम्हाला झोपडपटटी मुक्त मुंबई करायची आहे. मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. त्यातील ४० टक्के जनता ही झोपडपटटयांत राहते. त्यांना देखील चांगले जीवनमान मिळावे यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे कोटेचा म्हणाले.

गुटखा, ड्रग तस्करांचा मानखुर्दला विळखा

मानखुर्दसारख्या परिसरात गुटखा तस्कर आणि स्वस्त ड्रग तस्करांचा विळखा पडला आहे. या परिसरात अल्पसंख्यांक समाज मोठया प्रमाणात राहतो. आज या परिसरातील आई-वडिलांसमारे आपल्या लहान मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आपल्याला हा विळखा सोडवायचा आहे, असे त्यांनी सांगितले..

मुलुंडमध्ये बर्ड पार्क, टेकडयांचा विकास

मुलुंडमध्ये आम्हाला बर्ड पार्क तयार करायचे आहे. त्याचे डिझाईन तयार करण्यास सांगितले आहे. १५ ऑगस्टपर्यंत पालिकेकडून या कामाची वर्क ऑर्डरही निघू शकते. पुढील दोन वर्षांत हे बर्ड पार्क तयार होईल. मुलुंडमध्ये टेकडयाही मोठया प्रमाणात आहेत. त्यांचे सौंदर्यीकरण करून तिथे केबल-कार उभारण्याचा मानस आहे. जेणेकरून मुंबईकरांना या टेकडयांची सफर करता येईल, असेही मिहिर कोटेचा यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in