योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ - खर्गे, भाजपचे सरकार नको ही जनतेची इच्छा!

केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार नको, ही जनतेची इच्छा आहे ती वास्तवात आणण्यासाठी इंडिया आघाडी योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल, असे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर स्पष्ट केले.
योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ - खर्गे, भाजपचे सरकार नको ही जनतेची इच्छा!

नवी दिल्ली : केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार नको, ही जनतेची इच्छा आहे ती वास्तवात आणण्यासाठी इंडिया आघाडी योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल, असे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर स्पष्ट केले.

केंद्रात सरकार स्थापनेचा दावा सध्या करणार नाही, त्याबाबतचा पर्याय राखून ठेवला आहे, असे खर्गे यांनी सूचित केल्याचे बोलले जात आहे. यावेळी खर्गे यांनी इंडिया आघाडीचे निवेदन वाचून दाखविले. निवडणुकीचे निकाल, सरकार स्थापनेची शक्यता, नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू या माजी सहकाऱ्यांशी संपर्क साधावयाचा की नाही यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती.

तिरस्काराचे राजकारण, बोकाळलेला भ्रष्टाचार याचा जनतेला उबग आला होता. त्यामुळे मतदारांनी भाजपला सडेतोड जबाब दिला. घटनेचे रक्षण करण्यासाठी त्याचप्रमाणे महागाई, बेरोजगारीविरुद्ध आणि लोकशाही वाचविण्यासाठी जनतेने मतदान केले आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील फॅसिस्ट राजवटीविरुद्ध इंडिया आघाडी सातत्याने लढा देत राहील, इंडिया आघाडी एकत्रितपणे काम करून जनतेला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता निश्चितच करील, असेही खर्गे म्हणाले.

घटनेतील मूल्यांशी बांधिलकी असणाऱ्या पक्षांचे स्वागत

राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये ज्या मूल्यांचा अंतर्भाव आहे त्यांच्याशी मूलभूत बांधिलकी असणाऱ्या सर्व पक्षांचे इंडिया आघाडीत स्वागत आहे, असे खर्गे यांनी यावेळी स्पष्ट केले. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे, निर्धारपूर्वक लढत दिली, जनमताचा कौल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची कार्यशैली याविरोधात आहे. मोदी यांचा नैतिक पराभव होण्याबरोबरच हा त्यांच्यासाठी खूप मोठा वैयक्तिक राजकीय तोटा आहे, तरीही जनतेच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा त्यांनी निर्धार केला आहे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in