Lok Sabha Election Results 2024: कोण होणार बाजीगर? लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ८ वाजल्यापासून

Rahul Gandhi, PM Narendra Modi: १९ एप्रिल ते एक जून दरम्यान ८० दिवस यंदाची निवडणूक चालली. यंदा उष्णतेच्या लाटा असतानाही नागरिकांनी जोरदार मतदान केले.
Lok Sabha Election Results 2024: कोण होणार बाजीगर? लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ८ वाजल्यापासून

नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणूक रणसंग्रामात कोण 'बाजीगर' ठरणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निवडणुकीत आपले सर्वस्व पणाला लावले आहे. यंदाची निवडणूक सत्ताधारी व विरोधकांमध्ये अटीतटीची झाली. खेडेगावापासून शहरा-शहरांत कोण निवडून येणार याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही सत्तेचा डाव कोण जिंकणार याचीच चर्चा आहे. 'एक्झिट' पोलनी आपले कल जाहीर केले तरीही जनतेच्या मनात काय आहे, हे मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या एका तासातच देशाचा कल काय आहे हे दिसून येणार आहे. दरम्यान, 'एक्झिट पोल'नी पुन्हा मोदीराज येणार, असे अंदाज वर्तवल्याने शेअर बाजाराने उत्साहाच्या भरात २५०० अंशांची उत्तुंग भरारी मारली. १८ व्या लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून विक्रम घडवणार की, 'इंडिया' आघाडी अनपेक्षित उसळी घेऊन ही निवडणूक जिंकून इतिहास घडवेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मंगळवारी मतमोजणीपूर्वीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तब्बल ८० दिवस चाललेल्या निवडणूक प्रक्रियेत ५१ पक्ष सहभागी झाले असून ८,३६० उमेदवारांचे भवितव्य 'इलेक्ट्रॉनिक्स यंत्रा'त बंद झाले आहे. यंदा ७ टप्प्यात ५४३ लोकसभा जागांसाठी मतदान झाले. मंगळवारच्या निकालानंतर देशात कोणाची सत्ता येणार, हे स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीत भाजपप्रणित रालोआ व काँग्रेसप्रणित 'इंडिया' आघाडीमध्ये जोरदार लढत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून निवडणूक आयोग मतमोजणीला सुरुवात करणार आहे. सर्वात पहिल्यांदा टपालाद्वारे आलेल्या मतपत्रिकांची (पोस्टल बॅलेट) मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी होईल. लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश व ओदिशा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचे लक्ष

महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनात काय आहे हेही मंगळवारी कळणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीमुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणाचा बाजच बदललेला आहे. ४८ लोकसभा मतदारसंघांत महायुती व महाआघाडीत जोरदार रस्सीखेच आहे. राज्यातील २८९ ठिकाणी ४,३०९ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. राज्यात १४,५०७ जण मतमोजणीसाठी तैनात केले आहेत. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात

आली आहे. महाराष्ट्रातील जनता काय कौल देते याकडे सत्ताधारी 'महायुती' व विरोधी 'महाआघाडी'चे लक्ष आहे. महाराष्ट्रात यंदा पाच टप्प्यात मतदान झाले. १९ एप्रिल ते २० मे दरम्यान झालेल्या निवडणूक प्रक्रियेत ६१.३३ टक्के मतदान झाले. राज्यात १,१२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पवार व कपिल पाटील यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

तसेच बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे जिंकतात की अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार जिंकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शरद पवार व अजित पवार हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, संदीपान भुमरे हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भाजपप्रणित 'महायुती'ने ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे व अजित पवार यांची ताकदही या निवडणुकीतून कळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रचार करून राज्य पिंजून काढले.

मुंबई कोणाची? याचे उत्तर मिळणार

मुंबईवर कुणाचे वर्चस्व राहील, याचेही उत्तर मंगळवारी मिळणार आहे. शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे गट) हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई व मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटात जोरदार लढत होणार आहे. राज्यात शिवसेना (उबाठा) २१, काँग्रेस १७ व राष्ट्रवादी (शरद पवार गट) १० जागा, तर महायुतीतर्फे भाजपचे २८, शिवसेना (शिंदे गट) १५, अजित पवार गट (४), तर रासप (१) अशी निवडणूक लढत आहे. राज्यात ९,२९,४३,८९० पैकी ५,७०,०६,७७८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली-चिमूरमध्ये सर्वाधिक ७१.८८ टक्के, तर दक्षिण मुंबईत सर्वाधिक कमी ५०.०६ टक्के मतदान झाले.

logo
marathi.freepressjournal.in