दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला, उद्या मतदान; ८ पैकी ३ जागांवर सेना विरुद्ध सेना लढत

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (२६ एप्रिल रोजी) आठ जागांसाठी निवडणूक होत असून त्याचा प्रचार बुधवारी संपला. या ८ जागांसाठी तब्बल २०४ उमेदवार रिंगणात...
दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला, उद्या मतदान; ८ पैकी ३ जागांवर सेना विरुद्ध सेना लढत

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (२६ एप्रिल रोजी) आठ जागांसाठी निवडणूक होत असून त्याचा प्रचार बुधवारी संपला. या ८ जागांसाठी तब्बल २०४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, यवतमाळ-वाशीम आणि हिंगोली या जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात आमनेसामने लढत होणार आहे.

पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा जागांसाठी शुक्रवार, २६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत १६,५८९ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. अमरावतीमध्ये सर्वाधिक ३७, परभणीत ३४, हिंगोलीत ३३, वर्धा येथे २४, नांदेडमध्ये २३, बुलढाणा येथे २१, यवतमाळ-वाशीम येथे १७ आणि अकोला येथे १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

बुलढाण्यात शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे सेनेच्या ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांच्या विरोधात लढत आहेत. यवतमाळ-वाशिममध्ये शिंदे शिवसेनेने विद्यमान खासदार भावना गवळी यांना डावलून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने संजय देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. हिंगोलीत शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना डावलून पक्षाने बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे. परभणीत राज्यातील सत्ताधारी 'महायुती'चे सहयोगी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या विरोधात लढत आहेत.

अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत आहे.अमरावतीत सध्या भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात लढत होणार आहे. दिनेश बुब हे विधानसभेत दोन आमदार असलेल्या सत्ताधारी आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार आहेत.वर्ध्यात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) तिकिटावर निवडणूक लढणारे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्यात लढत होणार आहे. नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर हे काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या विरोधात आहेत.दुसऱ्या टप्प्यानंतर राज्यात संपूर्ण विदर्भातील मतदान पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या पाच जागांसाठी ६३.७० टक्के मतदान झाले. मतांची मोजणी ४ जून रोजी होणार आहे.

प्रकाश आंबेडकर अकोल्यातून रिंगणात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी आठपैकी सात जागा लढवत आहे. प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे प्रजासत्ताक सेनेचे उमेदवार म्हणून अमरावतीत रिंगणात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in